
Chopad Municipality Election 2025: ‘तुझ्या गळा-माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा’ अशी म्हणणारी माणसंच केसानं गळा कापत असल्याचा प्रत्यय नगरपालिका निवडणुकीतून दिसून येत आहे. मित्रपक्षाच एकमेकांवर गद्दारीचा, विश्वासघात केल्याचा आरोप करताना दिसत आहे. स्थानिक पातळीवरील कुरघोड्यांचे हे अतरंगी किस्से राज्यभरातून समोर येत आहे. चोपडा नगरपालिका सुद्धा त्याला अपवाद ठरलेली नाही. महायुती म्हणून लढण्याची तयारी होत असतानाच अचानक येथील समीकरण बदलले आहे. भाजपवर नाराजी व्यक्त करत येथे शिंदे सेनेने थेट काँग्रेसचा हात धरला आहे. त्याची आता एकच चर्चा सुरू आहे.
काँग्रेससोबत शिंदे गटाची युती
जळगावच्या चोपडा येथे शिवसेना शिंदे गट हा काँग्रेस सोबत युती करत नगर परिषदेची नगराध्यक्ष तसेच 31 नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट – काँग्रेसची युती तर त्यांच्या विरोधात भाजप – राष्ट्रवादी अजित पवार गट निवडणुकीच्या रिंगणात आहे. सत्तेत सहभागी शिवसेना शिंदे गट चक्क त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेस सोबत युती करून निवडणूक लढवत असल्याने या अभद्र युतीची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यामुळे असे अचानक काय झाले की काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली असा सवाल केल्या जात आहे.
आमदार चंद्रकांत सोनवणे यांची भाजपवर नाराजी
काँग्रेस सोबत युतीवर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. आम्हाला युतीमध्येच निवडणूक लढवायची होती, पण भाजपाने आम्हाला विश्वासात घेतले नाही, कुठलीही चर्चा केली नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिली आहे.
मित्रपक्ष भाजप जर त्यांच्या फायद्याचा विचार करत असेल तर मी सुद्धा आमच्या फायद्यासाठी काँग्रेस सोबत युती केल्याचे म्हणत आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली. परिस्थितीशी समझोता केला नाही तर अस्तित्व संपत, याच सिद्धतानुसार द्यायला जास्त भाजप विरुद्ध प्रचार करावा लागेल असे सोनवणे म्हणाले. मतदार संघात झालेला विकास व विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा कौल आमच्या बाजूला राहील निवडणुकीत आमचाच विजय होईल असा विश्वास आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.