मुख्यमंत्री अचानक जळगावात, हॉटेलमध्ये तीन नेत्यांमध्ये खलबतं, राजकारणात हायव्होल्टेज घडामोडी

| Updated on: Apr 05, 2024 | 9:56 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक जळगावात दाखल झाले. त्यांनी जळगावच्या एका हॉटेलात मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील या हॉटेलात दाखल झाले. यावेळी या तीनही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुख्यमंत्री अचानक जळगावात, हॉटेलमध्ये तीन नेत्यांमध्ये खलबतं, राजकारणात हायव्होल्टेज घडामोडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us on

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक जळगावात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावात येऊन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्याकडून जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची माहिती जाणून घेतली. रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांच्याविरोधात नाराज असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांनी ताबडतोब तत्काळ जळगावला बोलावून घेतले. मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जळगावच्या हॉटेलात तब्बल 25 मिनिटं बंद दरवाजाआड चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा हे मात्र गुलदस्तात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांनाही सोबत घेत एकच वाहनातून धुळ्यातील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. तब्बल पाऊण तास मुख्यमंत्री जळगावातील एका हॉटेलात थांबले होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे जळगावच्या हॉटेलात तब्बल पाऊण तास होते, तरीही त्यांच्याच पक्षाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जळगावात नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज धुळ्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. यासाठी ते आज जळगाव विमानतळावर आले. त्यांचा ताफा आज जळगाव विमानतळाहून धुळ्याच्या दिशेला जाणार होता. पण त्यांचा ताफा धुळ्याकडे मार्गस्थ होत असताना एकनाथ शिंदे जळगावात एका हॉटेलमध्ये थांबले. या हॉटेलमध्ये गिरीश महाजन त्यांच्यासोबत होते. गिरीश महाजन यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना बोलावून घेतलं. यावेळी तीनही नेत्यांमध्ये 25 मिनिटे चर्चा झाली. पण या नेत्यांनी बैठकीनंतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाची नाराजी बघायला मिळत आहे.