
जालना | 17 जुलै 2023 : जिल्हा परिषदांच्या शाळा म्हटल्या की काही पालकं नाकं मुरळतात. सरकारी शाळा, अंगणवाड्यांकडे पाहण्याचा काही पालकांचा दृष्टीकोनच वेगळा असतो. ते आपल्या पाल्यांना मोठमोठ्या खासगी शाळांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश देतात. पण जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा जो आत्मा असतो तो सहजासहज उमगणार नाही, असाच असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांची असणारी पोटतिडकी अफाट असते. आपल्या विद्यार्थ्याने शिकून खूप मोठा अधिकारी व्हावं, अशी या शिक्षकांची इच्छा असते. जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत घेतात. पण जिल्हा परिषद शाळा आणि अंगणावाड्यांबाबत काही पालकांच्या मनात शंका असते. त्यामुळे ते लाखो रुपये खर्चून पाल्याला खासगी शाळांमध्ये प्रवेश देतात. पण अशाच पालकांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी घटना समोर आली आहे.
जालना जिल्हा परिषदच्या सीईओ वर्षा मीना यांनी एका नवा आदर्श पालकांच्यासमोर उभा केला आहे. वर्षा मीना या IAS अधिकारी आहेत. तसेच त्यांचे पतीदेखील IAS अधिकारी आहे. असं असताना वर्षा मीना यांनी आपल्या पाल्याला शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेश दिला आहे. त्यामुळे जालन्यात वर्षा मीना यांचं कौतुक होत आहे. वर्षा मीना यांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देत त्यांनी इतर पालकांना देखील आपल्या पाल्यांना अंगणावाडी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणसाठी प्रवेश घेण्याचं आवाहन केलं आहे.
विशेष म्हणजे सध्याच्या घडीला प्रत्येक पालकांना इंग्लिश स्कुलचं वावडं आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची मुलं ही इंग्रजी किंवा खाजगी संस्थाच्या शाळेत शिक्षण घेत असतात. प्रत्येक पालकाचा इंगिलश स्कुलचा हट्ट असतो. मात्र या सर्वांना अपवाद ठरत जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांनी स्वत: चा मुलगा अथर्व याला थेट जालन्यातील दरेगाव येथील अंगणवाडीत प्रवेश दिला. वर्षा मीना यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचं आवाहन केलं.
“सरकारी शाळा, अंगणवाड्या चांगल्या नसतात, अशी आपली सगळ्यांची मानसिकता असते. पण मला तरी तसा वैयक्तिक अनुभव आलेला नाही. मी खूप अंगणवाड्यांना भेटी दिल्या आहेत. माझं बाळ आता 15 महिन्यांचं झालं आहे. त्याला कुठेतरी अंगणवाडीमध्ये टाकलं पाहिजे, असा विचार माझ्या मनात आला”, अशी प्रतिक्रिया वर्षा मीना यांनी दिली.
“ही अंगणवाडी चांगली आहे. विशेष म्हणजे जालना जवळपास 2000 अंगणवाड्या आहेत. या सर्व चांगल्या आहेत. आम्ही स्मार्ट अंगणवाडीचं नियोजन केलेलं आहे”, अशी माहिती मीना यांनी दिली.
“सरकारी शाळा आणि अंगणावाडी चांगली असतात. आपण आपल्या पाल्याला इथे पाठवलं पाहिजे. अनेकांना याबाबत आवाहन केलं पाहिजे. काही ठिकाणी दुरावस्था असल्याच्या घटना समोर येतात. पण त्यासाठी काम केलं पाहिजे. तसेच काम केलं जातही आहे. दरेगाव अंगणावाडी सारख्या ज्या अंगणावाड्या आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे”, अशी भूमिका वर्षा मीना यांनी मांडली.