मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर…काय म्हणाले जय पवार ?

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा वारसा चालवणाऱ्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना आता काँग्रेस पक्षाने टीकेचे लक्ष केले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरुन त्यांचा उल्लेख 'गुंगी गुडीया' असा करण्यात आल्याने राजकारण पेटले आहे.

मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर...काय म्हणाले जय पवार ?
Jay Pawar came to the defense of his mother
| Updated on: Aug 04, 2026 | 7:20 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विषयी काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून ‘गुंगी गुडीया’ अशी त्यांची केलेली संभावना यामुळे राज्यात वातावरण तापले आहे. या संदर्भात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची हक्कालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाने केली आहे. आता यावरुन काँग्रेसला चारीबाजूंनी घेरले जात आहे. आता सुनेत्रा पवार यांचे धाकटे पूत्र जय पवार यांनी या वादात आपली भूमिका मांडली आहे.

स्वर्गीय अजितदादा पवार यांचे धाकटे पूत्र जय पवार यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपली भूमिका मांडली आहे. त्यात ते म्हणतात की
माननीय सुनेत्रा पवार यांच्याबाबत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून, निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे असे म्हटले आहे.

जय पवार पुढे लिहितात की, माननीय सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असू शकतात; परंतु महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्वाला कमी लेखणारी अथवा त्यांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही.

राजकारण हे विचारांचे, धोरणांचे, कामगिरीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असते—महिलांचा अवमान करणाऱ्या शब्दांचे नव्हे. मतभेद जरूर असावेत; पण ते तथ्य, सभ्यता, संयम आणि लोकशाही मूल्यांच्या चौकटीतच व्यक्त झाले पाहिजेत.आज मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो, तिचा सन्मान हा अबाधित आणि निर्विवाद राहिलाच पाहिजे असेही या पोस्टमध्ये जय अजितदादा पवार यांनी म्हटले आहे.

लोकशाही संस्कृतीलाही काळिमा फासणारे

राजकारणात विजय-पराजय होत राहतात, सत्ता बदलत राहते; पण महिलांचा सन्मान हा कोणत्याही पक्षापेक्षा, कोणत्याही नेत्यापेक्षा आणि कोणत्याही राजकीय संघर्षापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे प्रत्येक विधान केवळ निषेधार्हच नाही, तर लोकशाही संस्कृतीलाही काळिमा फासणारे आहे असेही जय अजितदादा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us