जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर गिरीश महाजनांचे सूचक विधान, म्हणाले ते कायम संपर्कात…

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देताना पक्षांतर्गत असंतोषाचा इशारा दिला आहे.

जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर गिरीश महाजनांचे सूचक विधान, म्हणाले ते कायम संपर्कात...
Jayant Patil girish mahajan
| Updated on: Jul 13, 2025 | 2:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त नुकतंच समोर आले. येत्या मंगळवारी १५ जुलैला जयंत पाटील हे शरद पवारांकडे आपला राजीनामा सुपूर्द करण्यात असल्याचे बोललं जात आहे. यावरुन सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावर आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यामागे पक्षांतर्गत नाराजी असल्याची शक्यता गिरीश महाजन यांनी वर्तवली आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

जयंत पाटील यांनी शनिवारी १२ जुलै रोजी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. शरद पवार यांच्याकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी वक्तव्य केले. “जयंत पाटील हे पक्षामध्ये फार खुश आहेत असं मला वाटतं नाही. कालांतराने यात काही बदल होतो का बघू, ते माझ्या संपर्कात नेहमी असतात. मात्र, याबद्दल त्यांच्याशी कधी बोलणं झालं नाही.” असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

“शरद पवार गटात कुटुंब विरुद्ध कार्यकर्ते असा संघर्ष सुरु आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुद्धा तेच आहे. हा संघर्ष आता समोर आला आहे. मी माझी मुलगी, माझा पुतण्या, माझा जावई यापुढे पक्ष जातच नाही. देशात अनेक पक्ष आहे की ते कुटुंबाशिवाय बाहेर पडत नाही. त्यामुळे ते पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, जेष्ठ कार्यकर्ते आहेत. ते त्या पक्षातून बाहेर पडतील असा मला वाटतं. पक्ष सोडण्यासंदर्भात त्यांची माझ्याशी कधी चर्चा झाली नाही. जयंतराव हे मोठे नेते आहेत. त्यांना जर काही बोलायचं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील” असे गिरीश महाजन म्हणाले.

“आक्रमक राहण्यासारखा आता विरोधी पक्षांमध्ये काही राहिलेलं नाही. अनेक आमदार खासदार संपर्कामध्ये आहेत. कायदेशीर अडचण आहे तांत्रिक अडचण आहे त्यामुळे काही लोकांना घेता येत नाही”, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.

जर तुम्हाला बॅग खोलायला लावल्या तर…

आम्हीही जर तुम्हाला बॅग खोलायला लावल्या तर त्यांच्या नेत्यांकडे ज्या बॅगा आहेत त्यांच्याकडेही मोठे घबाड आहे ना? बॅगांमध्ये पैसे नाहीत असे त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र, जे काय असेल ते पोलीस तपास करतील, असा गंभीर आरोप भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर केला आहे. दरम्यान गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे जयंत पाटील यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. जयंत पाटील राजीनाम्यानंतर कोणता निर्णय घेतात, त्याचा राज्यातील राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.