‘सोलापूरकर तुम्ही बाबासाहेबांना अरेतुरे करता? शब्द मागे घे, नाही तर मी तुला झोडणार’; आव्हाड संतापले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अभिनेता राहुल सोलापूरकर याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, यावरून आव्हाडांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अभिनेता राहुल सोलापूरकर याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलं होतं. यानंतर सर्व स्थरातून संताप व्यक्त करण्यात आला, दरम्यान हा वाद ताजा असतानाच आता राहुल सोलापूरकर याने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असा जावई शोध राहुल सोलापूरकर याने लावला आहे. सोलापूरकर याने नवीन वादग्रस्त विधान करून पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे. राहुल सोलापूरकर याच्या या विधानानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत सोलापूरकरच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले आव्हाड?
राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !! असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ… pic.twitter.com/DHfhVgohqe
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2025
‘एवढंच नाही तर सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना आरेतुरे बोलतात? आम्ही म्हणतो ते आमचे बाप आहेत. तु म्हणशील का ते माझे बाप आहेत. अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलं. गप्प आपले शब्द मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेलं पण मी तुला झोडणार, मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवरायांचा अपमान आम्ही नाही सहन करणार, असं देखील आव्हाड यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी देखील या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. राहुल सोलापूरकरचे तोंड चपलीने फोडा आणि 1 लाख बक्षीस मिळवा, अशी घोषणा शरद कोळी यांनी केली आहे. शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकरला फोडून काढा,’ असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे.
