
येत्या २९ जून रोजी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यामुळे सर्व उमेदवारांनी कंबर कसली आहे. सध्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी एकूण १४० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यंदा चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे. संचालक पदाच्या १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत हमाल/माथाडी गटातून शंकरराव आव्हाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित १७ जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांमध्ये शेतकरी सेवा सोसायटीसाठी ११, ग्रामपंचायतीसाठी ४, व्यापारी मतदारसंघासाठी २ आणि हमाल/माथाडीसाठी १ (एक बिनविरोध वगळून) जागांचा समावेश आहे.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख पॅनेलमध्ये कडवी स्पर्धा सुरु आहे. अनेक आमदार आणि खासदारही प्रचारात उतले आहेत. त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी वाढली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू असून “आमचंच पॅनेल निवडून येणार” असा विश्वास सर्व उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.
येत्या २९ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेच मतमोजणी करून विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल. राज्यातील एक प्रतिष्ठित बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतदार राजा कोणाला कौल देतो आणि कुणाचा गुलाल उधळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीमुळे गेले काही दिवस तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.