कल्याण पुन्हा हादरलं; शूटींग पाहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन चिमुकलीला डांबून ठेवलं अन् रात्रभर..
कल्याणजवळील आंबिवली येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश म्हात्रे या दुकानाच्या मालकाने मुलीवर रात्रभर अत्याचार केला.

कल्याणजवळील आंबिवली परिसरात एका 11 वर्षीय निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शूटिंग बघायला गेलेल्या या चिमुकलीला गणेश म्हात्रे नावाच्या एका नराधम दुकानदाराने आपल्या दुकानात डांबून रात्रभर अत्याचार केला. या घृणास्पद कृत्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 11 वर्षीय पीडित मुलीचे आई-वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. 5 मे रोजी रात्री आठ वाजता ही मुलगी मैत्रिणीच्या घरी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. पण रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केला. परंतु ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती घराच्या परिसरातच आढळून आली.
नेमकं काय घडलं?
यानंतर कुटुंबियांनी तिला विचारणा केली. त्यावेळी पीडित मुलीने घडलेली घटना सांगितली. ती आंबिवली येथील नदीकिनारी सुरू असलेले शूटिंग बघण्यासाठी गेली होती. याच परिसरात आरोपी गणेश म्हात्रे याचे किराणा मालाचे दुकान आहे. या नराधमाची नजर मुलीवर पडताच त्याने तिला दुकानात बोलावले आणि जबरदस्ती करत थांबण्यास सांगितले. मुलीने विरोध करताच त्याने तिला दुकानात ओढले आणि शटर बंद केले. त्यानंतर तिच्यावर रात्रभर लैंगिक अत्याचार केला.
गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू
या हृदयद्रावक घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित दखल घेत आरोपी गणेश म्हात्रे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे आंबिवली परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. एका लहान मुलीसोबत झालेल्या या अमानुष कृत्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.
