कुणाचा हात तर कुणाचा पाय फ्रॅक्चर, अचानक लिफ्ट कोसळल्याने मोठा अपघात; कल्याणमध्ये 8 जणांचं काय झालं?

या घटनेने इमारतीमधील लिफ्टची देखभाल आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कुणाचा हात तर कुणाचा पाय फ्रॅक्चर, अचानक लिफ्ट कोसळल्याने मोठा अपघात; कल्याणमध्ये 8 जणांचं काय झालं?
फोटो प्रातनिधिक
| Edited By: | Updated on: Aug 31, 2025 | 10:12 AM

कल्याण पश्चिममधील आठ मजली रॉयस गॅलेक्सी इमारतीमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. इमारतीची लिफ्ट सहाव्या मजल्यावरून अचानक कोसळल्याने त्यात असणारे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींमध्ये चार जणांची प्रकृती गंभीर असून, दोघांचे पाय फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघातग्रस्त सर्व व्यक्ती गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या दर्शनासाठी इमारतीत आले होते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते, मात्र त्यांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. या अपघातामुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांनी व्यवस्थापनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रहिवाशांनुसार, इमारतीमध्ये दोन लिफ्ट आहेत, परंतु त्यापैकी अपघात झालेली लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त होती. या संदर्भात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. “या लिफ्टची दुरुस्ती कधीच झाली नाही. ती कधीही बंद पडायची किंवा अडकून राहायची. आम्ही अनेकवेळा याबद्दल सांगितले, पण कोणीही लक्ष दिले नाही,” असे एका रहिवाशाने सांगितले.

ही घटना केवळ व्यवस्थापनाच्या दुर्लक्षाचेच नव्हे, तर पालिकेच्या आणि सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीतील त्रुटींचेही द्योतक आहे. रहिवाशांनी आरोप केला आहे की, पालिकेकडून लिफ्टची नियमित देखभाल केली जात नाही आणि फायर लाइनसारख्या अत्यावश्यक सुरक्षा सुविधांकडेही दुर्लक्ष केले जाते. यामुळे इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात येत आहे.

या अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी लिफ्ट आणि इतर सुरक्षा उपकरणांची नियमित तपासणी करणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, इमारतीच्या व्यवस्थापकांवर आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे शहरांमधील जुन्या आणि नव्या दोन्ही इमारतींमधील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर नियम लागू करणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.