
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यातच आता कल्याण तालुक्यातील निंबवली गावात अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणच्या निंबवली गावाचे पोलीस पाटील उमेश केणे यांच्यावर भर चौकात धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गावातील काही समाजकंटकांनी केलेल्या बदनामीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या उमेश केणे यांना किरकोळ वादातून लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कल्याण तालुक्यातील निंबवली गावात रविवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. गावातील गुंड किरण केणे आणि त्याच्या तीन ते चार साथीदारांनी चौकात पोलीस पाटील उमेश केणे यांची बदनामी करण्यास सुरुवात केली. याबाबत माहिती मिळाल्यावर उमेश केणे यांनी त्यांच्याकडे जाब विचारला. यातून वाद वाढला. हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. त्यानंतर किरण केणे आणि त्याच्या साथीदारांनी चॉपर आणि तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी उमेश केणे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यामुळे निंबवली गावात दहशतीचे वातावरण आहे. गावाचे प्रमुख आणि नागरिकांना न्याय देणाऱ्या व्यक्तीवरच असा हल्ला झाल्याने लोकांमध्ये संतापाची भावना आहे. गावाच्या समस्या दूर करणारा आणि नागरिकांना न्याय मिळवून देणारा गावाचा पाटीलच सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाने कोणाकडे दाद मागावी?’ असा प्रश्न गावकऱ्यांकडून विचारला जात आहे. या घटनेमुळे बीडमधील सरपंच हत्येसारख्या गंभीर घटनांची आठवण झाली असून जिथे लोकप्रतिनिधींनाच अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागले.
दरम्यान, या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत आहेत. उमेश केणे यांच्या कुटुंबानेही या हल्ल्यानंतर भीती व्यक्त केली आहे. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली जात आहे. गावाच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस पाटलावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.