मानलेल्या बहिणीला सल्ला दिला, आईला घरी सोडून बाहेर पडला अन् काही क्षणात… नेमकं काय घडलं?
कल्याणजवळील म्हारळ येथे अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीची पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिल्याने ३६ वर्षीय सुपरवायझर रवींद्र आहिरे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. टिटवाळा पोलिसांनी मुख्य आरोपी दीपक डांगेसह तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याणजवळील म्हारळ गाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीची तक्रार पोलीस ठाण्यात करण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात धरून एका ३६ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रवींद्र आहिरे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवत अवघ्या काही तासांत मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील म्हारळ गावातील मालखन कंपाऊंड परिसरात शुक्रवारी रात्री ही थरारक घटना घडली. मृत रवींद्र आहिरे हे त्यांच्या एका मानलेल्या बहिणीच्या कुटुंबाला नेहमी मदत करत असत. मात्र याच परिसरातील दीपक डांगे नावाच्या विकृताने संबंधित महिलेच्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता. घाबरलेल्या मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्या महिलेने याविषयी रवींद्र आहिरे यांच्याशी चर्चा करून मदत मागितली.
रवींद्र यांनी पीडित कुटुंबाला धीर देत, या नराधमाविरोधात तात्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात रीतसर छेडछाडीची तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी आरोपी दीपक डांगेला आपण केलेल्या कृत्याची पोलीस तक्रार होणार असल्याची माहिती मिळाली. यामुळे त्याचा थरकाप उडाला. त्याने रवींद्र यांचा काटा काढण्याचा कट रचला. विशेष बाब म्हणजे, घटनेच्या काही वेळ आधीच रवींद्र आहिरे यांनी आपल्या आजारी आईला दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार केले होते. आईला सुखरूप घरी आणून सोडल्यानंतर, रवींद्र काही वैयक्तिक कामासाठी पुन्हा बाहेर पडले. मात्र, त्यांना माहित नव्हते की बाहेर काळ टपून बसला आहे.
तीन नराधमांकडून जीवघेणा हल्ला
शुक्रवारी रात्री, मुख्य आरोपी दीपक डांगे याने त्याचे साथीदार विजय भिडे आणि परशुराम भिडे या दोघांना सोबत घेतले आणि ते मालखन कंपाऊंड परिसरात दबा धरून बसले. रविंद्र आहिरे तिथे येताच या तिघांनी त्यांना गाठले. यानंतर पूर्ववैमनस्यातून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेले रवींद्र आहिरे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे म्हारळ आणि टिटवाळा परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुख्य आरोपी दीपक डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) खून आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तिन्ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
