Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
पैसा कमवण्यासाठी एखादी व्यक्ती दिवस -रात्र कष्ट करते, परंतु हातात पैसा टिकत नाही, हे अनेकांच्या बाबतीमध्ये घडतं. वास्तुशास्त्रानुसार त्यासाठी तुमच्या घरातील काही दोष कारणीभूत असू शकतात.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाही, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या येतात, त्या समस्या दूर करण्याचे काही अध्यात्मिक उपाय देखील सांगण्यात आले आहेत. अनेकांसोबत असं घडतं की, ते प्रचंड कष्ट करतात, दिवस रात्र मेहनत करतात. परंतु तरी देखील त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. हातात जसा पैसा येतो तसा तो कोणत्या न कोणत्या कारणासाठी खर्च होतो. तुमच्या हातात पैसा का टिकत नाही? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात काही वास्तूदोष निर्माण होतात, त्यावेळी देखील तुम्हाला आर्थिक समस्या जाणवतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
घराची उत्तर दिशा – वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धनाची देवात कुबेर यांची दिशा असते. त्यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे, जर तुमच्या घराच्या उत्तर दिशेचा कोपरा हा अस्वच्छ असेल, तिथे तुम्ही काही अवजड वस्तू ठेवल्या असतील तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, तुम्हाला पैशांशी संबंधित अडचणी येऊ शकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
पश्चिम दिशा – पश्चिम दिशा ही शनी देवांची दिशा असते, त्यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी, या दिशेला खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक आणि घड्याळा सारख्या वस्तू ठेवू नये, रद्दी देखील ठेवू नये, यामुळे शनीदोष निर्माण होऊ शकतो.
घराचा ब्रह्म भाग – तुमच्या घराचा जो बरोबर मध्य भाग आहे, त्याला ब्रह्म भाग असं म्हटलं जातं. पूर्वी अंगण असायचे, त्यामुळे अंगणातील मध्य भाग हा ब्रह्म भाग समजला जाई, मात्र आता फ्लॅट सिस्टम असल्यामुळे तुमच्या हॉलमधील मध्य भाग हा ब्रह्म भाग समजावा, तिथे कचरा होणार नाही, राडा होणार नाही याची काळजी घ्यावी असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
