धनंजय मुंडे यांच्या संपत्तीवर दावा करणार, आमदारकीचा राजीनामा द्या; खटला जिंकताच करूणा शर्मा अॅक्शन मोडवर
वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. हा खटला जिंकल्यानतंर आता करुण शर्मा या अॅक्शन मोडवर आल्या आहेत.

Karuna Sharma Allegation : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. हा खटला जिंकल्यानतंर आता करुण शर्मा या अॅक्शन मोडवर आल्या आहेत.
करुणा शर्मा यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले. यावेळी करुणा शर्मा यांनी मी धनंजय मुंडेंच्या संपूर्ण संपत्तीवर दावा करणार असल्याचे म्हटलं आहे.
“मला पोटगी मिळाली हा माझा विजय”
“मला पोटगी मिळाली हा माझा विजय आहे. माझी आई नव्हती. मला तुरुंगात टाकल्यापासून माझ्या बहीण आणि भावाने माझा नंबर ब्लॉक केला आहे. मी एकटीच लढत आहे. तीन वर्षापासून एकटीच लढत आहे. आई असती तर माझ्यावर ही वेळ कधीच आली नसती. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात. जेव्हा हे विचार येतात तेव्हा माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ती आत्महत्या करून मेली. तिने आमचा विचार केला नाही”, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
“वाल्मिक कराडने मला मारलं होतं”
“पहिली बायको म्हणून मला ऑर्डर दिली आहे. बायको नसल्याने पोटगी देऊ नये असं त्यांच्या वकिलाचं म्हणणं होतं. पण कोर्टाने मला बायको म्हणून मान्यता दिली आहे. कोर्टाचा निकाल मला मान्य नाही. मी हायकोर्टात जाणार आहे. मला १५ लाख रुपये पोटगी हवी आहे. एक लाख ७० हजार घराचं भाडं आहे. हे भाडं भरलं जात नाही. मेंटेनन्स ३० हजार दर महिना आहे. मुलगा बेरोजगार घरात आहे. दोन लाखात काय होणार? एका महिलेचं लढणं खूप मोठं असतं. मी तीन वर्षापासून एकटी लढत आहे. मी दागिनेही विकले आहे. बीडहून मुंबईला यायचं आणि तिथून पुन्हा बीडला जायचं. वाल्मिक कराडने मला मारलं होतं. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता”, असा खळबळजनक खुलासाही करुणा शर्मा यांनी केला.
“मी धनंजय मुंडे यांच्या संपूर्ण संपत्तीवर दावा करणार”
“मी धनंजय मुंडे यांच्या संपूर्ण संपत्तीवर दावा करणार आहे. धनंजय मुंडेची दुसरी पत्नी राजश्री यांच्या नावावर संपत्ती केली आहे. बेकायदेशीरपणे केली आहे. त्यावरही मी दावा करणार आहे”, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
“मुंडेंनी दुसरं लग्न करताना माझी परवानगी घेतली नाही”
“मुंडेंनी दुसरं लग्न करताना माझी परवानगी घेतली नव्हती. मला त्याची माहिती नव्हती. मी त्यावेळी इंदोरमध्ये होते”, असेही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
