
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नगरसेवकांची पळवापळवी अजून थांबलेली नाही. त्यातच आता कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे बेपत्ता होण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्रात विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे निवडून आलेले ४ प्रमुख नगरसेवक गेल्या १६ तारखेपासून अचानक नॉट रिचेबल झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही नगरसेवकांचे संपूर्ण कुटुंबच घरातून गायब झाले आहे. यामुळे शहरात राजकीय खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाने थेट पोस्टर वॉर छेडले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर राजकारण कमालीचे तापले आहे. ठाकरे गटाने केडीएमसीत ११ जागा जिंकून दमदार पुनरागमन केले आहे. मात्र आता निवडून आलेले नगरसेवकच फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पक्षाचे ४ निवडून आलेले नगरसेवक गायब झाल्याने शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ठाकरे गटाने याला लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे.
केडीएमसीच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारीला जाहीर झाला. या निवडणुकीनंतर कल्याण-डोंबिवलीतील राजकारणात मोठी शांतता पसरली होती. जी आता मोठ्या वादळाचे संकेत देत आहे. कल्याण डोंबिवीलीत मधुर म्हात्रे (कल्याण पूर्व), स्वप्नाली केणे (कल्याण पश्चिम), कीर्ती ढोणे आणि राहुल कोट हे नगरसेवक सध्या बेपत्ता आहेत. सर्वात धक्कादायक स्थिती मधुर म्हात्रे यांच्या प्रभागात आहे. म्हात्रे यांचे कुटुंब हे जुने शिवसैनिक मानले जाते, मात्र आता त्यांचे संपूर्ण घरच रिकामे आहे. त्यांच्या शेजाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “गेल्या आठ दिवसांपासून म्हात्रे कुटुंबीयांपैकी कोणीही दिसलेले नाही, घराला बाहेरून मोठे कुलूप आहे.”
कल्याण पश्चिमेतील स्वप्नाली केणे या केवळ नगरसेविका नसून त्या भागातील एक सक्रिय चेहरा आहेत. मात्र त्या आणि त्यांचे पती विनोद केणे दोघेही बेपत्ता असल्याने त्यांच्या सासूबाई हतबल झाल्या आहेत. माझा मुलगा आणि सून कोठे आहेत हे आम्हाला माहीत नाही, त्यांच्या जिवाला धोका असू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. एका लोकप्रतिनिधीचे अशा प्रकारे कुटुंबासह गायब होणे ही पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरत आहे.
या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या लोकांना पैशांचे आमिष दाखवले जात आहे किंवा यंत्रणांचा वापर करून धमकावले जात आहे, असा थेट आरोप त्यांनी सत्ताधारी गटावर केला आहे. संजय राऊतांच्या आदेशानंतर कल्याणमध्ये अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी शहराच्या प्रमुख चौकात, बस स्थानकांवर आणि नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर बेपत्ता नगरसेवकांचा शोध घेणारे पोस्टर्स लावले आहेत. यावर नगरसेवकांचे फोटो असून हे लोकप्रतिनिधी हरवले आहेत, कुणाला दिसल्यास कळवावे असा मजकूर लिहून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली आहे की, आगामी महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले असावे. कोळशेवाडी पोलिसांनी याप्रकरणी लेखी तक्रार दाखल करून घेतली आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास करत आहोत असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.