
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानंतर आता पक्षांतराला वेग आला आहे. कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीआधी अनेक माजी नगरसेवकांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका उर्मिला गोसावी, काँग्रेसषाचे माजी नगरसेवक अरुण गीध, माजी नगरसेविका वंदना गीध, बहुजन समाज पार्टीच्या माजी नगरसेविका सोनी अहिरे यांचा समावेश आहे. मात्र यातील 2 नगरसेवकांमुळे आता शिवसेना भाजपात जुंपली असल्याचे पहायला मिळत आहे. यातील दोन माजी नगरसेवक भाजपचे सदस्य असल्याचा दावा करत भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर करणार असल्याचेही म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कल्याण-डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. मात्र यातील 2 नगरसेवक भाजपचे सदस्य असल्याचा दावा भाजपने केला आहे. माजी नगरसेवक अरुण गीध व माजी नगरसेविका वंदना गीध हे भाजपचे सदस्य असून यांना उमेदवारी अर्ज देखील देणार असल्याचं भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे.
कल्याणमधील या 2 माजी नगरसेवकांबाबत बोलताना माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की, ‘भाजप आणि शिवसेनेमध्ये अलिखित करार झालेला आहे. भाजपने शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊ नये असं ठरलं आहे. हा करार असताना देखील काल ज्या अपक्ष नगरसेवकांनी प्रवेश केला होता ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सदस्य झाले होते. भारतीय जनता पार्टीकडून त्यांना व त्यांच्या बहिणीला तिकीट जाहीर झाले होते. मात्र त्यांना काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पक्षात प्रवेश दिलेला आहे.’
पुढे बोलताना पवार म्हणाले की, ‘नियम हेच ठरवतात आणि हेच मोडतात, भाजपमध्ये शिवसेनेमधील अनेक जण पक्षप्रवेश करण्यात इच्छुक आहेत, मात्र आम्ही त्यांना नाही सांगितले आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीतील अनेक शिवसेनेचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याचे इच्छुक आहेत. कुठल्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊ नये असं ठरलं आहे त्यामुळे आम्ही प्रवेश दिलेले आहे.’
पुढे बोलताना माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी माध्यमातून सर्वांना सांगितले आहे की युती होणार आहे. मात्र आता असं लक्षात येत आहे की शिवसेनेला भाजपबरोबर युती करायची नाही. एकीकडे युतीची बोलणी करायची दुसरीकडे भाजपच्या पाठीमागे खंजीर खुपसायचा हे सुरू आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश द्यायचा हे चुकीचं आहे. शिवसेनेची तक्रार आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे आम्ही केलेली आहे. युती करायची असेल तर अशा घटना घडल्या नाही पाहिजेत ही आमची भूमिका आहे.’