Ketan Agaewal Case: सोशल मीडिया, गुगल सर्चद्वारे रचला कट; केतन अग्रवाल प्रकरणात चार्जशीटमधून धक्कादायक खुलासा
Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आला असून त्यामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सिया गोयलने आधी गुगलवर आणि सोशल मीडियावर त्यासंदर्भात बरंच सर्च केल्याचं त्यात म्हटलंय.

Ketan Agarwal Case: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमधून या प्रकरणातील तपासासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, केतनला संपवण्याचा कट आखण्यासाठी सोशल मीडिया आणि गुगल सर्चचा वापर करण्यात आल्याचं चार्जशीटमध्ये नमूद आहे. आरोपींनी विविध घटनांचा आणि माहितीचा अभ्यास केल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. चार्जशीटनुसार, ‘सोनम केस’, आयफोनमधील कॉल हिस्ट्री कशी डिलीट करायची, लोहगड परिसर आणि ट्रेकिंगदरम्यान होणारे अपघात यासंदर्भात सर्च करण्यात आल्याचं नमूद आहे. याशिवाय ‘Death Cap Mushroom India’ असंही सर्च केल्याची माहिती तपासातून समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे. या सर्चचा कटाशी नेमका संबंध काय होता, याचा तपास करण्यात आला आहे.
फेसबुकवरील माहितीवरून लोहगडाची निवड?
चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, सांगवीतील मानसी गोविंदपुरकर यांच्या लोहगडावरील प्रकरणाबाबत फेसबुकवर उपलब्ध असलेली माहिती आरोपींच्या निदर्शनास आली. त्यानंतर लोहगडावरून केतनला दरीत ढकलून त्याला संपवण्याचा कट आखण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. यानंतर आरोपींनी घटनास्थळाची रेकी केल्याचंही चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 29 मे रोजी लोहगडाची रेकी करण्यात आली. त्यानंतर 31 मे रोजी सिया गोयलने केतनला लोहगडावर नेलं, घटनास्थळाचे फोटो काढले आणि ते चेतन चौधरीला दाखवण्यात आल्याचं चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. या माध्यमातून योग्य ठिकाण निश्चित करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
दरीत ढकलण्याचाही केला सराव
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. केतनला दरीत कशा पद्धतीने ढकलायचं, याचा लुल्लानगर परिसरात सराव करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. घटनेनंतर पोलिस आणि घटनास्थळी उपस्थित नागरिकांशी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, याचंही नियोजन करण्यात आल्याचं चार्जशीटमध्ये नमूद असल्याची माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा उल्लेख
चार्जशीटनुसार, ठरलेल्या योजनेप्रमाणे चेतन चौधरीने केतनला पाठीमागून धक्का दिला, तर सिया गोयलने त्याच्या पायावर लाथ मारून त्याला दरीत ढकलल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाहिल्याचंही चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या संपूर्ण कटाचा सूत्रधार रितेश हांगे असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
