Jalgaon Politics: जळगावात भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर; दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली, शिंदेसेनेच्या आमदारानं दिलं खुलं आव्हान

Kishor Patil Challenges Mangesh Chavan: जळगावमध्ये महायुतीत जुंपल्याचे चित्र समोर आले आहे. मंगेश चव्हाण आणि किशोर आप्पा पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

Jalgaon Politics: जळगावात भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर; दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली, शिंदेसेनेच्या आमदारानं दिलं खुलं आव्हान
Kishor Patil Targets Mangesh Chavan
| Updated on: Nov 23, 2026 | 5:53 PM

जळगाव जिल्ह्यातील राजकारणात आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सुरू झालेल्या या वादाला आता राजकीय संघर्षाचे स्वरूप आले आहे. किशोर आप्पा पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील महायुतीमधील नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

मंगेश चव्हाण यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भूमिकेवर किशोर आप्पा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंगेश चव्हाण यांनी आधी त्यांची आमदारकी सांभाळावी. त्यांना आचारसंहितेचीदेखील अक्कल नाही. जिल्हा बँकेची निवडणूक सोडा, त्यांना स्वतःची आमदारकी वाचवता येते का, ते आधी पाहावे, अशा शब्दांत किशोर आप्पा पाटील यांनी पलटवार केला.

Loading...

यावेळी त्यांनी मंगेश चव्हाण यांना खुला इशाराही दिला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्या मुलाच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आल्याचा गंभीर आरोप किशोर आप्पा पाटील यांनी केला. या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याकडे मंगेश चव्हाण यांची तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्याचा बॉस समजणाऱ्या मंगेश चव्हाण यांच्या मांजरीच्या गळ्यात घंटा माझ्या मुलाने बांधली आहे, असा टोला लगावत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच यापुढे भाजपचे इतर आमदारही या विषयात पुढाकार घेतील, असे सूचक विधान त्यांनी केले. हा वाद म्हणजे महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचा विषय नसल्याचे किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केले.

मंगेश चव्हाण म्हणाले की, सुमित पाटील यांनी जी टीका केली, त्यावर मी फार बोलणं उचित नाही. किशोर आप्पा यांनी त्याच्यामध्ये पाठराखण करणं योग्य नव्हतं. पण मी एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचा आणि या गोष्टीची किती साधर्म्य आहे, ते तुम्हीच अंदाज लावा. एका गावात एक टुकार मुलगा असतो. त्या गावातले काही लोक म्हणतात, याच्या तक्रारी बापाकडे केल्या पाहिजेत. त्या टुकार मुलाच्या तक्रारी बापाकडे काही प्रमुख लोक घेऊन जातात, की बाबा तुम्ही मुलाला समजावलं पाहिजे म्हणून. त्यामुळे फार काही अपेक्षा करण्याची गरज आता मला वाटत नाही. त्यांनी जी काही भूमिका घेतली आहे, ती भूमिका त्यांच्या स्तरावर त्यांना शुभेच्छा. हा माझ्या वतीने सल्ला नाही, ती गोष्ट मी तुम्हाला सांगितली. ती त्यांना जर लागू पडत असेल, तर योगायोग समजावा, असं त्यांनी सांगितलं आहे.

मात्र सत्ताधारी महायुतीतील दोन आमदारांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सुरू झालेला हा संघर्ष आता वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मंगेश चव्हाण या आरोपांना काय प्रत्युत्तर देतात आणि मुख्यमंत्री या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us