मम्मा-पप्पा, मला भूक लागलीय, घरी जायचंय… 21 दिवसांपासूनचा चिमुकल्याचा आक्रोश शांत

कोल्हापुरात शिरोळ तालुक्यातील धानोरा गावात दोन वर्षांच्या चिमुरड्यावर कुत्र्याने हल्ला केला होता. 

मम्मा-पप्पा, मला भूक लागलीय, घरी जायचंय... 21 दिवसांपासूनचा चिमुकल्याचा आक्रोश शांत
प्रातिनिधीक फोटो

कोल्हापूर : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. गेल्या 21 दिवसांपासून “मम्मा पप्पा मला घरी जायचे आहे” असा घुमणारा युवराजचा आवाज शांत झाला. कोल्हापुरात शिरोळ तालुक्यातील धानोरा गावात दोन वर्षांच्या चिमुरड्यावर कुत्र्याने हल्ला केला होता. (Kolhapur Child dies after Dog byte)

धानोरा गावातील 30 नोव्हेंबर 2020 ची दुपार. रखरखत्या उन्हात अवघ्या दोन वर्षांचा युवराज तोंदले घराशेजारी असणाऱ्या बिरदेव मंदिरात इवल्याशा पावलांनी बागडत होता. हसत-खेळत असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकल्या युवराजवर हल्ला केला आणि त्याच्या हाताचे लचके तोडले.

21 दिवसांची झुंज

जखमी युवराजला त्याच्या वडिलांनी आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केले. काही दिवसांच्या अंतराने त्याला इंजेक्शन देण्यात आले. 17 डिसेंबरला त्याचं शेवटचं इंजेक्शन होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी युवराज तापाने फणफणला.

रेबीजचे निदान

युवराजच्या वडिलांनी त्याला सांगलीतील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. कसेबसे दोन दिवस गेले आणि 20 डिसेंबर रोजी युवराजला रेबीज झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर युवराजला खाजगी डॉक्टरांनी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा करण्याचा सल्ला दिला. भारती हॉस्पिटलमध्ये युवराजवर रेबीजचे उपचार सुरु झाले. मात्र त्यांच्या उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही.

अंधाऱ्या खोलीत आरडाओरडा

पुढील उपचारासाठी युवराजला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला रविवारी दुपारी दोन वाजता रेबीज सेंटरमध्ये ठेवलं. रविवार आणि सोमवारचा पूर्ण दिवस युवराज एकटाच त्या अंधाऱ्या खोलीत आरडाओरडा करत होता. मम्मा पप्पा मला पाणी हवंय, मला भूक लागलीय, मला घरी जायचं आहे, अशा केविलवाण्या सूरात तो रडत होता. परंतु त्याचा कोणताच हट्ट त्याचे आई वडील पुरवू शकत नव्हते.

हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा

पप्पा या की, मम्मा पाहिजे असं युवराज तळमळीने हाका मारत होता. त्याचा हंबरडा सर्वांचं हृदय पिळवटून टाकत होता. शेवटी नको तेच झालं. सोमवार रात्री त्याचा आवाज पूर्णपणे शांत झाला. युवराजवर काळाने घाला घातला. मात्र त्याचा मम्मा पप्पा मला घरी जायचं आहे, हा आवाज अजूनही नातेवाईकांच्या कानात घुमत आहे.

संबंधित बातमी :

कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू, दूध प्यायलेले 200 जण रुग्णालयात

(Kolhapur Child dies after Dog byte)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI