
विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान कोल्हापुरातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा आज भाजप प्रवेश होणार आहे. प्रकाश आवाडे यांच्यासह चिरंजीव राहुल आवाडे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसला रामराम करून अपक्ष निवडून आलेल्या आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. 2019 साली भाजपच्या सुरेश हळवणकर यांचा पराभव करून प्रकाश आवाडे निवडून आले होते. आवडे कुटुंबियांच्या भाजप प्रवेशामुळे सुरेश हळवणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.
प्रकाश आवाडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 2019 ला विधानसभा निवडणुकीआधी प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढली. काँग्रेसशी कायम एकनिष्ठ असणाऱ्या प्रकाश आवाडे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी ते शिंदे गटात प्रवेश करतील, अशीही चर्चा होती. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी चार वाजता बैठक पार पडणार आहे.
महासैनिक दरबार हॉल परिसरात बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांकडून अमित शहा यांच्या स्वागताचे फलक लागले आहेत. बैठकी आधी अमित शाह आज अंबाबाई देवीचं दर्शनही घेणार आहेत. अमित शाह यांच्या या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान प्रकाश आवाडे आणि चिरंजीव राहुल आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी आवाडे यांचे समर्थकही भाजपमध्ये प्रवेश करतील.