Kolhapur Accident : खळबळजनक! चालकाकडून विपरीत घडलं, एसटी बसच्या चाकाखाली चिरडून कामगाराचा मृत्यू
कोल्हापुरात चालकाकडून विपरीत घटना घडली. एसटी बसच्या चाकाखाली चिरडून कामगाराचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात बसस्थानकातील एसटी वर्कशॉपमध्ये रॅम्पमध्ये काम करताना चाकाखाली चिरडून एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पांडुरंग अण्णाप्पा चव्हाण असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने वर्कशॉपमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील शाहुपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एसटी वर्कशॉपमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. एसटी वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या पांडुरंग चव्हाण यांचा अपघाती मृत्यू झाला. पांडुरंग चव्हाण हे एसटीमध्ये चालक म्हणून कार्यरत होते. पांडुरंग हे आजारी असल्याने त्यांची नेमणूक वर्कशॉपमध्ये करण्यात आली होती. पांडुरंग हे शनिवारी सकाळी वर्कशॉपमधील रॅम्पमघ्ये काम करून परत येत होते. त्याचवेळी सकाळी 11 वाजता चालक सिकंदर मणेर हे एसटी ही वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी घेऊन जात होते. त्यांनी रॅम्पवरून एसटी पुढे नेली. त्यावेळी एसटीच्या पुढच्या चाकाखाली पांडुरंग चव्हाण आले. त्यांच्या अंगावरून एसटीचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. वर्कशॉपमधील इतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे मणेर यांनी एसटी थांबवली. मात्र, तोपर्यंत चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकामधील वर्कशॉपमधील प्रकाराने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. चालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता बस पुढे घेतल्याने कामगाराचा हकनाक जीव गेला, असं बोललं जात आहे. या अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या अपघात प्रकरणी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगाराच्या मृत्यूने त्यांच्या सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात मृत्यू झाल्याने मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
