
राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. दरम्यान राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, आधी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर आता लवकरच महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, दरम्यान या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या सन्मान निधीला ब्रेक लागला होता. मध्यंतरी सरकारने नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले. तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे देखील येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे मकर संक्रांतीपूर्वी मिळणार आहेत, पंरतु 15 जानेवारी रोजी राज्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान असल्यानं काँग्रेसकडून यावर आक्षेप घेण्यात आला होता. काँग्रेसनं या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देखील पाठवलं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये मिळणार का हे पहावं लागणार आहे.
या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केवासयी सक्तीची केली होती, ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचं नाव या योजेनेतून वगळण्यात येणार आहे. या योजनेसाठी केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 होती, त्यानंतर आता ही साईट देखील बंद झाली आहे. परंतु तरी देखील काही महिलांना अजूनही या योजनेसाठी केवायसी करता येणार आहे. ज्या महिलांना पती किंंवा वडील नाहीत अशा महिलांना अजूनही केवायासी करता येणार असल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी हे त्यांच्या लॉगइनवरून केवायसी करत आहेत. त्यामुळे आता आशा लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजूनही राज्यातील तब्बल 45 लाख महिलांची केवायसी बाकी आहे.