Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकणार ? देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात दिलं उत्तर
महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पैसे वितरीत करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावरून आता मुख्यमंत्री फडणवीसांनी अवघ्या एका वाक्यात थेट उत्तर दिलं आहे. लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकणार का ? काय होणार ?

महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना जाहीर झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत असते. कधी कधी ती वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे. मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळ राज्यातील अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र असं असलं तरी लाडक्या बहिणीना डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता, ते पैसे अद्याप मिळालेले नाहीत. गेल्या महिन्यात नोव्हेंबरचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. मात्र डिसेंबर संपून जानेवारी उजाडला आणि जानेवारीचे 10 दिवस उलटून गेले तरी त्या दोन महिन्यांचा हप्ता किंवा ते पैसे काही अद्याप जमा झालेले नाहीत.
येत्या 14 किंवा 15 जानेवारी रोजी दोन्ही महिन्यांचे मिळून असे 3000 हजार रुपये महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. पण मतदानाच्या आदल्या दिवशीच डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 चे पैसे जमा झाल्यास ही गोष्टी 1 कोटींहून अधिक महिलांना प्रभावित करू शकते. यावरून आक्षेप नोंदवत काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहीलं असून महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पैसे वितरीत करण्यात यावेत अशी मागणी केली आहे. यावर राज्य निवडणूक आयोगाकडे उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या तक्रारीवर विचार करु असे आयोगाने उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 3 दिवस आधीच महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित झाला असून याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना काँग्रेसने लाडकी बहीण योजनेवर घेतलेल्या आक्षेपाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी थेट शब्दांत उत्तर देत याबद्दलचं कन्फ्युजन दूर केलं. ” काँग्रेस लाडक्या बहीण योजनेवर टीका करत आले आहे. ही ऑन गोईंग स्कीम आहे. कोणत्याही मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं आहे की, कोणतीच चालू योजना थांबवली जात नाही. त्यामुळे त्यांनी (काँग्रेसने) कितीही पत्र लिहिली तरी योजना थांबवता येत नाही. त्यामुळे ही लाडकी बहीण योजनाही थांबवली जाणार नाही. उलट लाडक्या बहिणींना पैसेच येतील” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
