
राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या मदतीमुळे अनेक महिलांना मोठा फायदा झाला आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेले आहे. अशातच आता या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बोलताना फडणवीसांनी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे नगराध्यक्षपदाचे भाजपा उमेदवार पराग संधान व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या सभेमध्ये दूर पर्यंत गर्दी दिसतेय. जणू भाजपचे सर्व मतदार या सभेत आले आहेत असं दिसत आहे. 3 तास उशिर झाला तरी आपण थांबला आहात. याचा अर्थ तुम्ही भाजपला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतलाय. आता आम्ही आलो आहोत उमेदवार पराग संधान यांचं विकासाशी संधान बांधून देण्यासाठी.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्वात आधी लाडक्या बहिणींची आठवण ठेवावी लागते. जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे , तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे कोणीच बंद करू शकणार नाही. या निवडणुकीत मी मतदान मागण्याकरिता आलो आहे मी कुणावरही टीका करणार नाही. महाराष्ट्रातील नागरी भागाला कसं विकसित करायचं याची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे तयार आहे. विवेक भैय्यांनी मांडलेल्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे.
‘जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, जनतेच्या जीवनात परिवर्तन झाले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. आम्ही इथे अनेक अतिक्रमणे नियमित केले. आम्ही केवळ अतिक्रमणे नियमित करून थांबणार नाहीत तर ₹2.5 लाख देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतील पक्के घर देखील आपण देणार आहोत. कोपरगावमध्ये 660 अतिक्रमणे निघाली, त्यांचे कोणतेही पुनर्वसन झाले नाही. त्यांचे पुनर्वसन निश्चितपणे नगरपालिकेत आपले सरकार आल्यावर आपण करू’ असंही फडणवीस म्हणाले.