MukhyaMantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?, आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट

महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्याच्या विलंबाबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी योजना चालूच राहणार असल्याचे सांगितले आहे आणि लवकरच हप्ता वितरित केला जाईल असे आश्वासन दिले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देणे बंद केल्याबद्दलही माहिती देण्यात आली आहे.

MukhyaMantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?, आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय म्हणाल्या अदिती तटकरे ?
Image Credit source: social media
| Updated on: Jun 03, 2025 | 12:57 PM

लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नाही. त्यामुळे लाखो महिलांचं लक्ष या हप्त्याकडे लागलेलं असतानाच आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खुद्द महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबतची मोठी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणीला कधी हप्ता मिळणार याबाबतचं सुतोवाच आदिती तटकरे यांनी केलं आहे. लवकरच लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. लाडकी बहिण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय. ही योजना चालू राहणार आहे. चार महिन्यापूर्वीच्या तपासणीत लक्षात आले होते की, सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत. तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे, असं सांगतानाच लाडक्या बहिणींना मे महिन्यांचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

नुकसानीचा आढावा

मान्सूनपूर्व पावसामुळं शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचा आढावा घेण्यात आल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांना ऊस तोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे. त्याची कारणे शोधायला सांगितली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सूचनांची अंमलबजावणी करू

आज महिला आयोगाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेणारी बैठक सुरू होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. महिला आयोगासंदर्भातील बैठकीला काहींना निमंत्रित करता आले नाही. बैठकीतून काही सूचना येतील त्यावर कार्यवाही करू. काही बदल करण्याच्या सूचना आल्या तर त्या अंमलात आणू. महायुतीतून कुणी वैयक्तीक टीका केलेली नाही. महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे. सूचनांचा विचार नक्की करू, असंही त्या म्हणाल्या.

निधी कमी झाला नाही

यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्राच्या धर्तीवर स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आमच्या खात्याचा निधी कमी झाला नाही. उलट निधी वाढवून मिळाला आहे. महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी धोरणात्मक निर्णय झाला आहे. अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या धर्तीवर देखील स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणीसंदर्भात आणि आमच्या निधी संदर्भात भाष्य केलं आहे. निधी कुठेही कमी झालेला नाही, असं अशोक ऊईके म्हणाले.