राज्यातील 305 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम

दोन दिवसाच्या सततच्या पावसामुळे नागरिक सुखावले असले, तरीही राज्यातील तब्बल 305 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची धक्कादायक माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यातील 305 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम

नागपूर : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम पाहायला मिळाला. महाराष्ट्रात विविध भागात मोठ्या पावसाची अनेकांना प्रतीक्षा असली, तरी  राज्यात अनेक ठिकाणी सरीवर सरी बरसत आहे. यामुळे गावागावांत शेतीच्या कामांना वेग आला आहे. दोन दिवसाच्या सततच्या पावसामुळे नागरिक सुखावले असले, तरीही राज्यातील तब्बल 305 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची धक्कादायक माहिती हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या दोन दिवसापासून मुंबई, पुणे, नाशिक, कोकण या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली होती. याशिवाय कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाने झोडपून काढलं आहे. एकीकडे हे चित्र असलं, तरी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम पाहायला मिळत आहे.

दरम्यान यंदा महाराष्ट्रात जून महिन्याच्या अखेरीस मान्सून सक्रीय झाला. त्यामुळे राज्यात 25 जूननंतर पावसाने सर्वत्र हजेरी लावली. पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरीही राज्यात 305 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तसेच 29 जूनपर्यंत अवघ्या 46 तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

त्याशिवाय 29 जूनपर्यंत 352 तालुक्यांपैकी तब्बल 306 तालुक्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद हवामान विभागाद्वारे करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यंदा 23 तालुक्यात सरासरीच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर 101 तालुक्यात सरासरीच्या 25 ते 50 टक्के पाऊस पडला आहे. तसेच 119 तालुक्यात समाधानकारक म्हणजे 50 ते 75 टक्के पाऊस पडला आहे. तर 63 तालुक्यात 75 ते 100 टक्के इतका पाऊस पडला आहे. तर 100 टक्के पावसाची नोंद झालेल्या तालुक्यामध्ये राज्यातील केवळ 46 तालुक्यांची नोंद  करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही कमी पाऊस झाल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी 29 जूनपर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात 28 टक्के पाणी जमा झालं होतं. मात्र यंदा केवळ 19 टक्के पाणी धरणात जमा झाले आहे. त्यामुळे राज्यात मान्सून सक्रीय झाला असला, तरी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात या दुष्काळग्रस्त भागात अद्याप पाऊस झालेला नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *