
एरव्ही रिकाम्या धावणाऱ्या मोनोरेलला मंगळवारी पावसाने लोकलचे मार्ग बंद असल्याने अतिरिक्त गर्दी झाल्याने बाका प्रसंग ओढवला. प्रवाशांनी खचाखच भरलेली मोनोरेल चेंबुर आणि भक्तीपार्क येथे सायंकाळी अचानक बंद पडल्याने सव्वा तास जीव टांगणीला लागलेल्या दोनशेहून अधिक प्रवाशांची अग्निशमन दलाचे कशीबशी सुटका केली. मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने तिच्यात बिघाड झाल्याचे स्पष्टीकरण एमएमआरडीएने दिले. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता मोनोरेलमध्ये गर्दीच्या वेळी लिमिटेड प्रवासीच बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मोनोरेलचे व्यवस्थापन आधी मलेशियन कंपनीकडे होते आणि तिचे रेकही मलेशियाचे आहेत. आता मोनोरेलकडे मोजकेच रेक असून त्यातही अनेक रेक वारंवार बिघडत असतात. त्यामुळे मोनोरेल बिनभरोशाची आहे. ज्याला वेळेच पोहचायचे बंधन नाही म्हणजे तासभर ज्याच्याकडे अतिरिक्त वेळ आहे त्याचीच पावले मोनोरेलकडे वळतात. कालच्या बिघाडानंतर मोनोरेलमध्ये आता गर्दीच्या वेळी कमी प्रवासी राहातील याची दक्षता घेतली जाणार आहे आणि तशा सूचना सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.
कालच्या बुधवारी घडलेल्या घटनेनंतर एमएमआरडीएने आणि एमएमएमओसीएलने अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अंशकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
मोनोरेलची क्षमता १०४ टनांपर्यंत आहे.परंतू मोनोरेलच्या गाड्यांचे एकूण आयुर्मान पाहता तसेच त्यांची परिवहन क्षमता पाहता यापुढे कोणत्याही गाडीत प्रवासी संख्येची मर्यादा ओलांडली जाऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. आणि ही प्रवासी क्षमता १०२ ते १०४ दरम्यान इतकीच राहिल यापेक्षा वाढणार नाही यासाठी स्टेशनवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. गाडीत प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून नंतरच गाडी पुढे सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक ट्रेनमध्ये आत एक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आला आहे, जो आतील गर्दीवर लक्ष ठेवेल. तसेच मोनो पायलटसह एक टेक्निशियनही पाठवला जाणार आहे.
प्रत्येक मोनोरेलमध्ये ४ डबे असून प्रत्येक डब्यात २ व्हेंटिलेशन खिडक्या आहेत — म्हणजे एका गाडीत एकूण ८ खिडक्या. या खिडक्यांची तातडीने तपासणी करून त्यांचे स्पष्ट लेबलिंग करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी घाबरुन न जाता संयम बाळगावा.
आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे, सुरक्षित मार्ग कुठला आहे, याबाबत स्पष्ट माहिती असलेले सूचना फलक गाड्यांमध्ये लावण्यात आले आहेत. त्यात वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत म्हणजे या सुचना अधिक ठळकपणे सहज प्रवाशांना दिसतील.
मोनोरेलच्या सर्व गाड्यांची तातडीने तपासणी करण्याचे डायरेक्टर मेंटेनन्स यांना देण्यात आले आहेत. यामुळे वरील सर्व बाबी काटेकोरपणे अंमलात येतील.
* मोनोरेलसाठी नव्या १० गाड्या मागवण्यात आल्या आहेत. पैकी ७ गाड्या डेपोमध्ये दाखल झाल्या असून त्यांची तपासणी आणि ट्रायल सुरु आहे. या ट्रायलनंतर सर्टिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग या गाड्या सेवेत दाखल केल्या जातील. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढेल आणि उपलब्ध मोनोरेल गाड्यांवरील ताण कमी होईल.