
बंडखोरीचा कोणताही फटका भाजपला बसणार नाही.. असं वक्तव्य भाजप आमदार परिणय फुके यांनी केलं आहे. बंडखोरी झाली असली तरी, भजपचा मतदार हा पक्षाचा असतो, तो कोणत्या नेत्याचा नसतो… त्यामुळे बंडाखोरीचा कोणताच फटका भाजपला पडणार नाही. राज्यात 29 पैकी 25 ठिकाणी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता येईल असा दावा भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे.
अमरावती महानगरपालिकेसाठी केवळ 53.65 टक्के मतदान झालं आहे. 6 लाख 77 हजार 180 मतदारापैकी केवळ 3 लाख 63 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मागील 2017 च्या निवडणुकीमध्ये 54.54 टक्के मतदान झालं होतं. आज 22 प्रभागातून 87 नगरसेवक निवडले जाणार आहेत, तर 661 उमेदवार रिंगणात आहेत. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपला सत्ता राखण्याचं आव्हान आहे. मागील 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजपला 45 जागा मिळत एकहाती सत्ता मिळाली होती. सकाळी 10 वाजता अमरावतीच्या नवसारी येथे एकाच ठिकाणी होणार 14 टेबलवर मतमोजणीला सुरवात होणार आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये चार ठिकाणी मतमोजणी होणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहा वाजल्यापासून 29 प्रभागातील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गरवारे स्टेडियम, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व सेंट फ्रान्सिस हायस्कूल मध्ये मतमोजणी सुरु होईल. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. सुरुवातीला टपाली मताची मोजणी होणार आहे.
लातूर महापालिका निवडणुकीत गुरुवारी सरासरी ६०.०८ टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानाला चांगलाच वेग आला. रात्री उशीरापर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदान सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा एक गुन्हा नोंद झालेला आहे. तर काही ठिकाणी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन गटातील वाद शमला आहे. १८ प्रभागात ७० नगरसेवकांसाठी ३५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. या ठिकाणी एकूण 61.79 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नांदेड महापालिकेच्या एकूण 81 जागांसाठी 491 उमेदवार रिंगणात आहेत.
नागपूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यातील 37 प्रभागात प्रत्येकी 4 उमेदवार आहेत. तर एका प्रभागात 3 उमेदवार आहेत. नागपुरात एकूण 151 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 साली येथे भाजपाची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपाने भाजप 108 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला फक्त 29 जागांवर विजय मिळवता आला होता.
विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीचा सामना रंगला. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि भाजपचे मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या करिष्म्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण हे करिष्मा दाखवणार की, आमदार प्रताप पाटील चिखलीकर गेम करणार याची चर्चा रंगली आहे. या महापालिकेत सर्वच पक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपाटले आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीचा सामना रंगतदार झाला आहे.
काँग्रेस नेते माजी आमदार सुरेश वरपूडकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली. येथे उद्धवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांच्याशी त्यांना सामना करावा लागला. परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेस एकत्रित लढत असल्याने येथे चुरस आहे.
जालना शहर महानगरपालिकेच्या 16 प्रभागातील 65 जागेसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे.सकाळी 10 वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरुवात होत आहे.पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जालन्यात कोण बाजी मारणार याची सर्वाना उत्सुकता लागली आहे. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये होणार प्रमुख लढत, भाजप नेते रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडी सोडता सर्वच पक्षांनी जालना महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांनी भाजपचा गड लढवला तर मंत्री संजय शिरसाट यांनी शिंदेसेनाचा किल्ला लढवला. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उद्धव सेनेची खिंड लढवली. वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम सुद्धा रणांगणात होते. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची ठरली. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीमुळे कुणाचा गेम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांमध्ये कोण बाजी मारणार याची सर्वत्रच उत्सुकता आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर महायुती मुसंडी मारणार की विरोधक वचपा काढणार याची चर्चा रंगली आहे. जालना ही नवीन महानगरपालिका यावेळी अस्तित्वात आली आहे. तर इतर चार महापालिकांमध्ये सत्ता समीकरणं बदलेली आहेत. या पाच महापालिकांमध्ये एकूण 281 जागांसाठी एकूण 1,715 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. एकूण 24,48,574 मतदार होते. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीतील भाजप आणि शिंदे सेना हे एकमेकांविरोधात लढले. तर नांदेडमध्ये पण धुसफूस दिसली. लातूरमध्ये भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले. तर परभणी ऐनवेळी वरपूडकरांनी दुसरीकडे धाव घेतल्याने येथील निवडणूक रंगतदार ठरली. आता या सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निकाल कुणाच्या बाजूने लागतो आणि मतदार राजा कुणाला कौल देतो हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल.