अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले आहेत. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळत आहे. कारण सासरे शिवाजी कर्डिलेंना जावई राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी मदत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती केल्यामुळे काँग्रेसच्या 5 नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्यामुळे भाजपचा मार्ग आणखी सुकर झाला. 68 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत 35 ही मॅजिक फिगर होती.  तिसऱ्या नंबरवर राहूनही शिवाजी कर्डिले यांनी महापौर भाजपचाच होईल, असा दावा यापूर्वीच केला होता. तसंच त्यांनी आज करुन दाखवलं.

श्रीपाद छिंदमला मारहाण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपतून हकालपट्टी झालेल्या श्रीपाद छिंदमने शिवसेनेला मतदान केलं. मात्र छिंदमने आपल्याला (शिवसेनेला) मतदान का केलं, या रागातून शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला चोप दिला. तसंच भाजपनेच छिंदमला आपल्याला मतदान करण्यास बजावल्याचा आरोप शिवसेनेने केला. मात्र जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी हा आरोप फेटाळला.

अभद्र युती

एकंदरीत अहमदनगरमध्ये सासरे शिवाजी कर्डिले यांची भाजप आणि जावई संग्राम जगताप यांची राष्ट्रवादी अशी अभद्र युती पाहायला मिळाली. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा सोयरे धायऱ्यांचं राजकारण सुरु झालं.

LIVE UPDATE :

 • भाजप जातीयवादी असल्याने राष्ट्रवादीसोबत राहून त्यांना मतदान करणार नाही – काँग्रेस गटनेत्या
 • अहमदनगर महापौर निवडणुकीवर काँग्रेसचा बहिष्कार, भाजप-राष्ट्रवादी अशा अभ्रद्र युतीमुळे काँग्रेस नगरसेवक संतप्त
 • काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, भाजप-राष्ट्रवादी अशा अभद्र युतीमुळे बहिष्कार टाकणार – सूत्रांची माहिती
 • शिवसेनेच्या दोन बेपत्ता नगरसेवकांपैकी एक नगरसेवक पालिकेत दाखल
 • काँग्रेसचे पाच नगरसेवक तटस्थ राहण्याची शक्यता
 • काँग्रेसचे पाच नगरसेवक पालिकेत दाखल
 • छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा श्रीपाद छिंदम महापालिकेत दाखल
 • शिवसेनेचे दोन नगरसेवक बेपत्ता

दरम्यान,  महापौर आणि उपमहापौर पदासाठी सर्वच पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे कोणता पक्ष बहुमत सिद्ध करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. सर्वाधिक जागा असलेल्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 12-अ मधील  माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी महापौर पदाचा अर्ज दाखल केला होता. तर उपमहापौर पदासाठी  प्रभाग क्रमांक 13 अ मधील माजी गटनेते गणेश उर्फ उमेश कवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्याचबरोबर, 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपकडून प्रभाग क्रमांक 6 ब मधील माजी सभापती बाबासाहेब वाकळे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला. तर उपमहापौर पदासाठी प्रभाग क्रमांक 9 ब मधून भाजपच्या मालन ढोणे यांनी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्या क्रमांकावर 18 जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक 1 ड मधील कडून संपत बारस्कर यांनी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक 2 ब मधून रुपाली वारे या उपमहापौर पदासाठी उभ्या होत्या.

महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला. सत्तेसाठी 35 नगरसेवकांचं संख्याबळ असणं आवश्यक होतं. भाजप नगरसेवकांची संख्या फक्त 14 असताना भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी दावा केला होता. 35 ही मॅजिक फिगर भाजप कशी जमवणार हे  गुलदस्त्यात होतं तरी सत्ता स्थापनेचा दावा भाजपने केला होता. हा दावा भाजपने खरा करुन दाखवला.

अहमदनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल 2018 :

 • शिवसेना – 24
 • राष्ट्रवादी -18
 • भाजप -14
 • काँग्रेस – 5
 • बसपा – 04
 • समाजवादी पक्ष – 01
 • अपक्ष 2
 • एकूण – 68

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI