मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार? शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीममध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार? शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2025 | 3:31 PM

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा समाजाचा ओबीसीमधून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅझेटला विरोध होत आहे, मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र ते ओबीसीमधून नसावं अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. त्यामुळे सध्या राज्यात मराठा समाजाविरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालं आहे. त्यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली.  सूत्रांकडून मिळालेल्या माहिती या बैठकीमध्ये  मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनांच संधी द्या, ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या, अशा स्पष्ट सूचना या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील आमदार, खासदारांना दिल्या आहेत.

दरम्यान दुसरीकडे या बैठकीमध्ये पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत युती नकोच असं पुन्हा एकदा शरद पवार यांनी या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये सांगितल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला होता, तो म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण आणि नव्या उमेदवारांना संधी द्यायची. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या रणनितीचा आता पक्षात किती फायदा होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.