LPG Shortage : उदरभरण झालं महाग ! भजी, वडापाव ते शेगाव कचोरीपर्यंत.. गॅस टंचाईमुळे काय काय महागलं ?

इराण-अमेरिका-इस्रायलमधील युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या असून अनेक हॉटेल्स व लहान व्यवसाय बंद पडले आहेत. मुंबईत ३५% हॉटेल्स बंद झाली असून येत्या काही दिवसांत हे प्रमाण आणखी वाढू शकतं.

LPG Shortage :  उदरभरण झालं महाग ! भजी, वडापाव ते शेगाव कचोरीपर्यंत.. गॅस टंचाईमुळे काय काय महागलं ?
वडापाव, भजी आणि अनेक पदार्थांचे वाढले दर
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 16, 2026 | 9:51 AM

युद्ध सुरू आहे इराण- अमेरिका-इस्रायलमध्ये आणि त्याचे टके मात्र बसत आहेत भारतातल्या नागरिकांना. युद्धाचा परिणाम फक्त जीवितहानी, विध्वंसापुरताच मर्यादित नाहीये, तर या तिन्ही देशांमुळे भारतासह इतर अनेक देश होरपळत आहेत. भारत गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस टंचाई जाणवत असून त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत आणखी वाढझाली आहे. गावं असो की शहर, बहुतांश ठिकाणी लोक सकाळपासून ते दुपारच्या कडाक्याच्या उन्हापर्यंत, सिलिंडर मिळवण्यासाठी रांगेत तासनतास उभे असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून बंद आहे.

तर व्यावसायिक सिलेंडरही मिळत नसल्याने हॉटेल, छोटे-मोठे व्यवसाय हेही अडचणीत सापडले आहेत. गॅस नसल्यामुळे अनेकांनी चुलींचा सहारा घेतला, तर काहींनी हॉटेल, दुकांनांना टाळंही लावलं, मेसंही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे बाहेरगावी राहणारे विद्यार्थी, नोकरदार यांच्या उदरभरणचे वांदे होत आहेत.

पोट भरणं झालं महाग..

त्यातच काही ठिकाणी आता खाण्याच्या पदार्थाच्या किंमती वाढू लागल्या आहेत. काही ठिकाणी वडापा, भजीपाव, समोसा यांच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच गॅस टंचाईचा फटका जगप्रसिद्ध शेगाव कचोरीलाही बसला असून टंचाईमपळे आता शेगाव कचोरीचे भावही वाढल्याचे दिसत आहे.

ठाण्यात वडापाव 5 रुपयांनी महागला

ठाण्यात वडापाव पाच रुपयांनी महागला आहे. गॅस सिलेंडर , बेसन आणि तेलाच्या वाढत्या किमतीमुळे वडापावचे दर वाढले आहे. सर्वसामान्यांना परवडणारा, पटकन पोट भरतं अशी खरंतर वडापावची ख्याति, मात्र टंचाईच्या झळा वडापावालाही बसत असून हा वडापाव महागल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. एवढंच नव्हे तर आता वडापाव सोबत समोसा पाव, कांदा भजी, बटाटा भजी यांच्या दरांमध्येही वाढ झाली आहे.

मुंबईत 35 टक्के हॉटेल्स बंद

मुंबईत 35 टक्के हॉटेल्स बंद झाली आहेत. व्यावसायिक सिलेंडर पुरवठ्यावर निर्बंध आणखी गॅस मिळत नाहीये, त्याच्या परिणामीच हे घडताना दिसत आहे. आधी मेन्यू कमी केले, पण हळूहळू काही हॉटेल्स बंदच करण्यात आली. येत्या बुधवारपर्यंत हॉटेल बंद होण्याचं प्रमाण 75 टक्क्यांपर्यत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

जगप्रसिद्ध शेगाव कचोरीलाही गॅस टंचाईचा फटका..

शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहत ते श्री संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि तिथली सुप्रसिद्ध अशी कचोरी. देशातील कुठलाही भाविक शेगावला गेल्यानंतर संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेगाव येथील खमंग, कुरकुरीत अशा कचोरीचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही. मात्र आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे याचा फटका आता शेगाव कचोरीलाही बसला आहे . व्यावसायिक गॅस सिलेंडर टंचाईमुळे शेगाव येथील कचोरीचे ही भाव वाढले आहेत. गेल्या आठवड्यात शेगाव कचोरी दहा रुपयाला मिळत होती, ती आता दोन रुपयांनी वाढून बारा रुपयाला झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने ही भाववाढ केल्याचं बोललं जात आहे. पण याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य खवय्यांना बसत असल्याचे समोर येत आहे..

नाशिकमध्ये अनेक ठिकाणी नाश्ता सेंटर बंद

नाशिक शहरात अनेक ठिकाणी सकाळी सुरू असलेले नाश्ता सेंटर बंद झालं आहे. गॅस तुटवड्यामुळे नाश्ता देण्यास अडचण येत असल्याने हे निर्णय घेण्यात आले आहेत. कालपर्यंत ज्या ठिकाणी नाश्त्यासाठी गर्दी व्हायची , त्याच ठिकाणी आज एकदम शुकशुकाट आहे. आता नाश्त्याऐवजी फळांचे स्टॉल लागले आहेत. गॅस नसल्याने आता अनेकांनी नाश्त्याऐवजी फ्रुट स्टॉल लावायला सुरूवात केली आहे.

सोलापुरात चहाप्रेमींच्या चहावर येणार गदा ?

व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे सोलापुरात चहा व्यावसायिकांवर टांगती तलवार आहे. व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने जेमतेम एक-दोन दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे. त्यामुळे चहा प्रेमींवर गदा येऊ शकते. गॅस नसल्याने आता हातात असलेला गॅस संपल्यानंतर कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ ये शकते. आमची रोजी रोटी बंद झाल्यावर आम्ही काय करायचं असा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे.सरकारने काहीतरी उपाय करून आम्हाला गॅस द्यावा अशी मागणी अनेकांनी केली आहे.

 

Follow Us