महापालिका निवडणुकांपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का, मंत्र्यांच्या मुलाला…

महापालिका निवडणुका तोंडावर असताना महाडमधील राजकीय घडामोडींनी राज्याला हादरवले आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्ल्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला.

महापालिका निवडणुकांपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का, मंत्र्यांच्या मुलाला...
शिंदे गटातील मंत्र्यांना धक्का
Image Credit source: social media
| Updated on: Dec 26, 2025 | 9:03 AM

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका आता तोडावर आल्या असून मतदानासाठी अवघा काहीच काळ उरला आहे. महापालिका निवडणुकांत सत्ता स्थापनेसाठी सर्वच उत्सुक असून भाजप, शिवेसना, एनसीपी, काँग्रेस असे सर्वच गट जोमाने कामाला लागले आहेत. या निवडणुकांपूर्वी आता काही दिवसांपूर्वीच नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी झाली. त्याचदरम्यान महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान मदतान सुरू असताना एक अनुचित प्रकार घडला. त्यावेळी झालेल्या राड्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या पुत्राचा अटकपूर्व जामीन हा मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे गोगावले यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महाड विधानसभा समन्वयक, शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी फरार गोगावले याचा पत्ता सांगणाऱ्यास एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे.

नेमकं काय घडलं ?

काही दिवसांपूर्वीच महाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान सुरू होते, तेव्हा विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यावेळी शहरातील शाळा क्रमांक पाचच्या समोर दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली होती. यात अनेक जण जखमी झाले होते, या हाणामारीमुळे प्रचंड गोंधळा झाला होता.

मतदानाच्या दिवशीच झालेल्या या हल्ल्यानंतर शहर पोलिसांनी विकास गोगावले यांच्यासह 29 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र तेव्हापासूनच सर्व आरोपी फरार झाले होते. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी विकास गोगावले यांनी माणगाव न्यायालयात धाव घेतली होती. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माणगाव न्यायालयाने मात्र विकास गोगावले यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ॲड. हर्षद भडभडे यांनी अर्धा तास केलेला युक्तिवादानंतर न्यायमूर्तींनी विकास गोगावले यांच्यावर असलेले गुन्हे लक्षात घेता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करता येत नाही असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

माणगाव येथे अटकपूर्व जामीन मिळवण्यात अपयश आल्यानंतर विकास गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र  मुंबई उच्च न्यायालयाकडूनही गोगावले यांचा हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला .