हे चित्र पहिल्यांदा दिसणार… उद्धव ठाकरे यांच्यासहीत महाविकास आघाडीचे नेते आज रस्त्यावर, आज कुठे कुठे आंदोलन?

Badlapur School Rape Case Maharashtra Bandh : बदलापूर घटनेच्या निषेध नोंदवण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन केलं जाणार आहे. महाविकासआघाडीचे नेते पहिल्यांदाच अशाप्रकारे संयुक्त आंदोलन करत आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे चित्र पहिल्यांदा दिसणार... उद्धव ठाकरे यांच्यासहीत महाविकास आघाडीचे नेते आज रस्त्यावर, आज कुठे कुठे आंदोलन?
| Updated on: Aug 24, 2024 | 10:07 AM

Badlapur School Rape Case Maharashtra Bandh : बदलापुरात दोन शालेय विद्यार्थिंनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटल. या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. तर काही ठिकाणी आंदोलने होत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येणार आहेत.

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन करण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईतील शिवसेना भवनाजवळ आंदोलन करणार आहेत. तर राष्ट्रवादी पवार गटाकडून शरद पवार हे पुण्यात मूक आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. तर काँग्रेसकडूनही काळा झेंडा आणि काळी पट्टी बांधून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. महाविकासआघाडीचे नेते पहिल्यांदाच अशाप्रकारे संयुक्त आंदोलन करत आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरे करणार आंदोलन

बदलापूर घटनेच्या निषेध नोंदवण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईच्या शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन केले जाणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ते काळी रिबीन बांधून या घटनेचा आणि सरकारचा निषेध करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन परिसरात काळ्या रंगाचा स्टेज बांधण्यात आला आहे. तसेच शिवसेना भवनाबाहेर मोठी बॅनरबाजीही करण्यात आली आहे.

शरद पवारांकडून पुण्यात मूक आंदोलन

राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार आज पुण्यात मूक आंदोलन करणार आहेत. या मूक आंदोलनात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून आंदोलन करणार आहेत. यावेळी तोंडावर काळी पट्टी बांधत आणि हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन करणार आहेत. आज सकाळी 10 ते 11 एक तास आंदोलन केले जाणार आहे.

काँग्रेसचे नेतेही रस्त्यावर उतरणार

त्यासोबतच काँग्रेस नेते नाना पटोले आज ठाण्यात मूक आंदोलन करणार आहे. नाना पटोलेंसह काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करणार आहेत. महाविकासआघाडीचे सर्वच प्रमुख नेते आज रस्त्यावर उतरुन या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यावेळी हे सर्व नेते तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध नोंदवणार आहेत. या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्रात ठिकठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळाली.