Maharashtra Board 10th Result 2026 Declared : दहावीचा निकाल जाहीर, कोणता विभाग अव्वल, कोणता मागे?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून ९७.६२ टक्क्यांसह कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दहावीच्या निकालात किंचित घट झाली आहे.
विभागावार निकाल किती?
राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या निकालाच्या शर्यतीत कोकण विभाग अव्वल स्थानावर पाहायला मिळत आहे. कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर (८८.४१ टक्के) विभागाचा लागला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुणे विभागाने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. मात्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल राज्यात सर्वात कमी लागला आहे.
| क्र. | विभागीय मंडळाचे नाव | निकालाची टक्केवारी |
| १ | कोकण | ९७.६२% |
| २ | कोल्हापूर | ९५.४७% |
| ३ | मुंबई | ९४.९७% |
| ४ | पुणे | ९४.२४% |
| ५ | नाशिक | ९०.९३% |
| ६ | अमरावती | ९०.५०% |
| ७ | नागपूर | ८९.०७% |
| ८ | लातूर | ८८.४२% |
| ९ | छत्रपती संभाजीनगर | ८८.४१% |
| राज्याचा एकूण निकाल | ९२.०९% |
मुलींचीच बाजी
दरम्यान दहावीच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा मुलांना मागे टाकले आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९६ टक्के असून मुलांचे प्रमाण ८९.५६ टक्के आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक लागला आहे. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
परीक्षेत नापास झालेल्यांना ११ वीत प्रवेश घेता येणार
दरम्यान पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी वेळ मिळावा म्हणून यंदा १० दिवस आधी परीक्षा घेण्यात आली, ज्याचा सकारात्मक परिणाम निकालावर दिसून आला. यंदापासून मार्कशीट आणि सर्टिफिकेट स्वतंत्र न छापता एकाच पेपरवर दोन्ही माहिती दिली जाणार आहे. क्रीडा, कला आणि स्काऊट गाईडमधील विशेष प्राविण्यासाठी विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात आले आहेत. तसेच दोन विषयात नापास झालेल्या ४१,०६५ विद्यार्थ्यांना एटीकेटीची सुविधा देण्यात आली असून त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येईल.