Cabinet Meeting Decision Today : नोकरभरती आरक्षण ते तीर्थक्षेत्र विकास, मंत्रिमंडळ बैठकीत 7 सर्वात मोठे निर्णय!
Today Cabinet Meeting Decision : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणावरही या बैठकीत चर्चा झाली. आता या बैठकीत खेळाडूंच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर करण्यात आले आहे.

Maharashtra Cabinet Meeting Decision : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणावरही या बैठकीत चर्चा झाली. आता या बैठकीत खेळाडूंच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, विधि व न्याय विभागाशी संंबंधितही काही निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत एकूण सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते निर्णय झाले?
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग
खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या ५% आरक्षणाबाबत सुधारित धोरण लागू करण्यात आले आहे. यापुर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धिपत्रके, परिपत्रक, पत्र रद्द करण्यात आले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी “प्रगती (PRAGATI – Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration)” प्रकल्प. प्रकल्प सन २०२६-२०३१ या कालावधीत राबविण्यात येणार. त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास व त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करण्यास मान्यता दिलेली आहे.
वस्त्रोद्योग विभाग
ह्योसंग इंडिया प्रा.लि. यांना भांडवली अनुदान देण्यास मंजुरी मिळालेली आहे.
विधि व न्याय विभाग
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय होणार. या न्यायालयासाठी आवश्यक पदे व खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.
महसूल विभाग
मुंबईतील कैवल्यधाम ईश्वरदास चुन्नीलाल योगिक सेंटरच्या भाडेपट्ट्याचे सवलतीच्या दराने नुतनीकरणास मंजुरी देण्यात आली आहे.
महसूल विभाग
चेंबूर येथील भिक्खू संघ युनायटेड बुद्धिस्ट मिशन संस्थेला त्यांच्या वहिवाटीतील जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
महसूल विभाग
नागपूरमधील कोराडी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
