राज्यभरात चक्काजाम, बच्चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’, पुणे, नागपूर, अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात कुठे काय स्थिती?
प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांनी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले आहे. कर्जमाफी, शेतमजुरांच्या, दिव्यांगांच्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. अमरावती, नागपूर, पुणे आदी शहरांमध्ये हे आंदोलन जोरदारपणे झाले आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला संपूर्ण राज्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अमरावती, नागपूर, पुणे, वसई, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर आणि जालना या ठिकाणी हे आंदोलन केले जत आहे. या आंदोलनामुळे ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात आले असून काही आंदोलकांकडून महामार्ग रोखण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला मेंढपाळांनीही पाठिंबा दिला आहे.
अमरावतीत चक्काजाम आंदोलनाला मोठा प्रतिसाद
बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलनाला अमरावती जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अमरावती-यवतमाळ महामार्गावरील चिरोडी गावात मेंढपाळांनी शेकडो मेंढ्या रस्त्यावर आणून महामार्ग रोखला. कर्जमाफीसोबतच मेंढपाळांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, अमरावती-परतवाडा मार्गावरील अचलपूर येथे बच्चू कडूंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन सुरू आहे, ज्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. बैतूल-अकोट राष्ट्रीय महामार्गावर खरपी गावाजवळही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी महामार्ग मोकळा करण्याची विनंती केली असली तरी कार्यकर्ते आक्रमक दिसून आले.
छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडूंचे आंदोलन
तर नागपूरमध्ये ऑटोमोटिव्ह चौकात प्रहारचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूर जिल्ह्यात तीन ठिकाणी प्रहारकडून चक्काजाम करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या ऑटोमोटिव्ह चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात बच्चू कडूंचे चक्काजाम आंदोलन होत आहे. क्रांती चौक येथे हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या ठिकाणी बच्चू कडू यांच्यासह इम्तियाज जलील आणि खासदार कल्याण काळे उपस्थित राहणार आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी वसई हद्दीत चिंचोटी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर गुजरात लेनवर १०० हून अधिक कार्यकर्ते जमा होऊन महामार्ग अडवला. तर पुण्यातील गुडलक चौकात प्रहार संघटनेने आंदोलन केले. सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील टेमुर्डा गावात प्रहारचे नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी काही काळ आंदोलन दडपले, पण चंद्रपूर-नागपूर महामार्ग काही वेळासाठी बंद करण्यात आला होता.
छोट्या-मोठ्या संघटनांचे पदाधिकारी आक्रमक
त्यासोबतच सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालुक्यातील दुनगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांसह प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा रास्ता रोको केला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला, ज्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सध्या राज्यात विविध ठिकाणी प्रहार संघटना आणि इतर छोट्या-मोठ्या संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक महामार्ज ठप्प झाले आहेत.
