Devendra Fadnavis : मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांना मिळाला कुठल्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा अधिकार, पण..
Devendra Fadnavis : राज्य सरकारकडून नियमात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना थेट कुठल्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. पण असं केल्यानंतर एका प्रक्रियेचं पालन सुद्धा करावं लागणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक अत्यंत महत्वाचा अधिकार मिळाला आहे. भविष्यात महायुती सरकारमध्ये कदाचित या अधिकारामुळे काही पडसादही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६’ अधिसूचित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करता येणार आहे. अधिसूचनेनुसार, सार्वजनिक हिताच्या बाबतीत मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकतात.
मात्र,अशा निर्णयामागील कारणे मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहेत. संबंधित विभागाच्या कामकाजाची प्राथमिक जबाबदारी त्या विभागाच्या मंत्र्याचीच राहणार आहे. नव्या नियमांमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या प्रशासकीय अधिकार व कार्यपद्धतीबाबत स्पष्टता आहे. मुख्यमंत्री एखाद्या विभागातील कागदपत्रे मागवू शकतात आणि संबंधित मंत्री तसेच विभागाच्या सचिवांनी ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल.
निर्णय मागे घ्यावा, बदलावा अशी मागणी असते
मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर काहीवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतं. त्यामागे सार्वजनिक हिताची कारणं दिली जातात. अशा प्रसंगी सरकारने निर्णय मागे घ्यावा, बदलावा अशी मागणी असते. आता अशा निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांना थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळाला आहे. मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याचा निर्णय सार्वजनिक हिताचा हवाला देऊन बदलू शकतात. मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या या अधिकाराचा ते कसा वापर करतात? महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे शिवसेना आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयात मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार का? हे सगळं चित्र वेळेबरोबर स्पष्ट होईल.
देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. मतदार यादीच्या SIR उपक्रमासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची होणार बैठक. आगामी काळातील संघटनात्मक बाबी आणि SIR संदर्भातील नियोजनावर होणार मार्गदर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि SIR प्रभारी भगवानदास सबनानी उपस्थित राहणार तसेच आगामी कुंभमेळा नियोजना संदर्भात देखील मुख्यमंत्री आढावा घेण्याची शक्यता आहे.