
भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण त्यानंतरही महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता. त्यावेळी देशाचा नकाशा वेगळा होता. भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे आजच्या दिवसाला एक वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे. १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी माणूस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले होते. त्यामुळे त्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. १ मे हा दिवस महाराष्ट्र दिनासह आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही ओळखला जातो. आज राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई प्रांतात अनेक प्रांतीय राज्यांचा समावेश करण्यात आला होता. या प्रांतात गुजराती आणि मराठी भाषिक लोक एकत्र राहत होते. त्यानंतर भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषिकांनी स्वतःच्या राज्याची मागणी केली, तर मराठी भाषिकही स्वतंत्र राज्यासाठी संघर्ष करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली आणि याच आंदोलनांच्या परिणामामुळे १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्यांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली.
२१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोरा फाउंटन परिसरात तणाव होता. राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिल्याने मराठी जनता संतप्त झाली होती. निषेध सभांमधून वातावरण तापले होते. कामगारांचा एक मोठा मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन येथे जमला. पोलिसांनी लाठीचार्ज करूनही सत्याग्रही डगमगले नाहीत. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशाने गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
या हुतात्म्यांच्या बलिदानाला आणि मराठी माणसाच्या आंदोलनाला यश आले आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानंतर १९६५ मध्ये फ्लोरा फाउंटन येथे हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. आज आपण महाराष्ट्र दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत असलो, तरी या शूर हुतात्म्यांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे.
आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यात पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन घुगे आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली. दुसरीकडे, मुंबईत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालत, महाराष्ट्र देशाच्या विकासात नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.