Maharashtra Drought Situation : 1972 सारखा भीषण दुष्काळ पडणार का? मराठवाड्यात पावसाची स्थिती गंभीर, मागच्या 50 दिवसांपासून..
Maharashtra Drought Situation : महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून पाऊस जवळपास गायबच झाला आहे. मराठवाड्यातही स्थिती खूप गंभीर आहे. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पण आकाशात पावसाचे ढग दूरदूर पर्यंत दिसत नाहीयत.

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून पाऊस जवळपास गायबच आहे. यंदा एल निनोचा परिणाम जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने पावसाळा सुरु होण्याआधीच वर्तवला होता. एल निनो सक्रीय झाल्यानंतर सरासरीपेक्षा पाऊस कमी पडतो. सध्या महाराष्ट्रावर गंभीर दुष्काळाचं सावट आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. धरणं कोरडी पडतायत. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पण आकाशात पावसाचे ढग दूरदूर पर्यंत दिसत नाहीयत. मराठवाड्यात तर स्थिती गंभीर आहे. मराठवाड्यात गेल्या 50 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. विभागात पावसाची तब्बल 199 मिमी तूट असून 275 महसूल मंडळांमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामावर पावसाअभावी संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.
पर्जन्यमानातही मोठी तफावत दिसून येत आहे. लातूरमध्ये सरासरीच्या केवळ 49.82 टक्के, तर धाराशिवमध्ये 56.03 टक्के आणि परभणीत 55.26 टक्के पाऊस झाला आहे. जालना 72.71 टक्के, छत्रपती संभाजीनगर 72.60 टक्के आणि नांदेडमध्ये 72.18 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम असून खरीप हंगामासह आगामी पाणीटंचाईचे आव्हानही वाढले आहे.
पावसाची स्थिती
छत्रपती संभाजीनगर – 422 मिमी – 72.60%
जालना – 438 मिमी – 72.71%
बीड – 331 मिमी, – 58.52%
लातूर – 351 मिमी – 49.82%
धाराशिव – 337 मिमी – 56.03%
नांदेड – 578 मिमी – 72.18%
परभणी – 420 मिमी – 55.26%
हिंगोली – 543 मिमी – 68.33%
