
राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे राज्यात निवडणुकांचा धुराळा उडत आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महादेव जानकर यांनी अप्रत्यक्षपणे महाविकासआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
जत नगरपरिषद ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. सध्याच्या निवडणुकीत प्रामुख्याने चौरंगी लढत दिसून येत आहे. सांगलीच्या जतमध्ये महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे व उमेदवारांच्या प्रचारासाठी एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महादेव जानकर यांनी हजेरी लावली. यावेळी महादेव जानकर यांनी जोरदार भाषण केले. या भाषणाद्वारे त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत महाविकास आघाडीसोबत युती करत असल्याचे संकेत दिले आहेत.
मी त्यांच्या छावणीत राहून आलो आहे. मला त्यांची नियत आणि नीती मला चांगलीच माहिती आहे. आरक्षणाचे गाजर तुम्हाला दाखवलं जाईल. पण ते दिलं जाणार नाही. चार रस्ते केले म्हणजे झालं नाही. समाजात भांडण झाली तुमच्या भागीदारापासून बाजूला करण्याचे पाप भाजपने केले आहे. माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही कोणालाही मतदान करा. पण आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, असे विधान महादेव जानकर यांनी केले आहे.
कारण भाजपा जाती- जातीत भांडण लावणार पक्ष आहे. आज एकनाथ शिंदे व अजित पवारांची काय अवस्था आहे. तशी अवस्था माझी झाली नाही. कारण मी या भानगडी केल्या नाहीत असा टोला देखील महादेव जानकर यांनी लगावला.
दरम्यान महादेव जानकर यांनी जतच्या व्यासपीठावरून केलेले जाहीर विधान सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जात आहे. जानकर यांच्या आवाहनामुळे धनगर समाजाची मतं फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात धनगर समर्थक भाजपपासून दूर जाऊन मविआकडे वळू शकतात, असेही बोललं जात आहे.