Maharashtra Flood : राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा, नुकसानग्रस्तांना कशाप्रकारे मदत दिली जाणार? वाचा सविस्तर

राज्य सरकारनं आज पूरग्रस्तांसाठी मदतनिधीची घोषणा केली आहे. त्यात नुकसानग्रस्त कुटुंबाला सानुग्रह अनुदान देण्यासह, नुकसानाची वर्गवारी करुन मदत देण्यात येणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Maharashtra Flood : राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा, नुकसानग्रस्तांना कशाप्रकारे मदत दिली जाणार? वाचा सविस्तर
मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार


मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त नागरिकांसाठी आज अखेर मदतनिधीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती आणि इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानाबाबत सादरीकरण केलं. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (State government announces relief for flood victims)

नुकसानग्रस्तांना कशाप्रकारे मदत दिली जाणार?

राज्यातील काही जिल्ह्यात 80 टक्के तर काही जिल्ह्यात 90 टक्के पंचनामे झाले आहेत. अद्यापही काही जिल्ह्यात पंचनामे करण्याचं काम सुरु आहे. अशावेळी राज्य सरकारनं आज पूरग्रस्तांसाठी मदतनिधीची घोषणा केली आहे. त्यात नुकसानग्रस्त कुटुंबाला सानुग्रह अनुदान देण्यासह, नुकसानाची वर्गवारी करुन मदत देण्यात येणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

नेमकी मदत कशी असेल?

>> प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान

>> घराचं पूर्ण नुकसान झालं असेल तर दीड लाख रुपयांची मदत, घराचं 50 टक्के नुकसान झालं असल्यास 50 हजार रुपये, 25 टक्के नुकसान झालं असल्यास 25 हजार रुपये तर अंशत: नुकसान झालं असल्यास 15 हजार रुपये मदत दिली जाईल.

>> दुकानांचं नुकसान झालं असल्यास 50 हजार रुपये मदत

>> छोट्या टपरी धारकांना 10 हजार रुपये मदत

>> मृतांच्या नातेवाईकांना एसडीआरएफ 3 लाख रुपये, मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख, गोपीनाथ मुंडे अपघात विमा (शेतकरी) २ लाख आणि केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये मदत मिळणार

>> प्राण्यांसाठीही निकषाच्या पलिकडे जाऊन वेगळी मदत दिली जाणार

मदत रोख स्वरुपात नाही तर बँकेत जमा होणार

ही मदत कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागासह अकोला, अमरावती, नांदेड, परभणी अशा राज्यातील सर्व भागासाठी मदत दिली जाणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही मदत रोख स्वरुपात मिळणार नाही. तर नागरिकांच्या बँक खात्यात ही रक्कम टाकली जाणार आहे.

तळीये गावाचं पुनर्वसन ‘म्हाडा’ करणार

महाड तालुक्यातील तळीये हे गाव दरड कोसळून उद्ध्वस्त झालं. या गावाचं पुनर्वसन केलं जाणार आहे. यासह डोंगराच्या पायथ्याशी, डोंगर उतारावर असलेली गावंही पुनर्वसित करण्याचा विचार आहे. दरम्यान, तळीयेसह आजूबाजूच्या 4 वाड्यांचं पुनर्वसन म्हाडाकडून केलं जाणार आहे. नागरिकांना म्हाडाकडून घरं बांधून दिली जाणार आहेत. एका घरासाठी साडे चार लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिलीय.

संबंधित बातम्या :

पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय

राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

State government announces relief for flood victims

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI