एकनाथ शिंदेंचे लाडक्या बहिणींना मोठे आश्वासन, म्हणाले “दर महिन्याला…”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच पसरलेल्या लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ही योजना कोणत्याही कारणास्तव बंद होणार नाही आणि सरकारने या योजनेसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केली आहे.

राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक कारणांनी कायमच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे बोललं जात आहे. यावरुन विरोधकही टीका करत आहेत. यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. ते जळगावात बोलत होते.
एकनाथ शिंदे यांनी आज जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी “लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही. या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेले नाही”, असे ठामपणे सांगितले.
लाडकी बहीण योजना कुठेही अडचणीत येणार नाही
“लाडक्या बहिणींसाठीची आर्थिक तरतूद सरकारने केली आहे. दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या पैशाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना कुठेही अडचणीत येणार नाही. या योजनेमुळे सरकारही कुठे अडचणीत येणार नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले. “संतांच्या लाडक्या बहिणीच्या मुक्ताईच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे, तिथल्या वारकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो,” असे म्हणत त्यांनी जळगाव मुक्ताईनगरच्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर देणे टाळले. “माझ्या मनात एकच आहे, मी पांडुरंगाला साकडं घालतो… हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे… बळीराजाला चांगले दिवस येऊ दे… चांगला पाऊस होऊ दे, चांगले पीक येऊ दे आणि बळीराजा सुखी होऊ दे… महाराष्ट्र समृद्ध होऊ दे, एवढेच सांगतो, असे म्हटले.
खास ‘पिंक रिक्षा’तून प्रवास
दरम्यान, जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका खास ‘पिंक रिक्षा’तून प्रवास केला. पिंक रिक्षाचालक रंजना सपकाळे यांच्या आग्रहास्तव शिंदे यांनी त्यांच्या रिक्षामध्ये बसून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.
