
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता झाली आहे. महायुतीसह महाविकास आघाडी, इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी पायाला भिंगली लावून प्रचार केला. महायुतीतील प्रमुख पक्षांचे नेते गेल्या काही दिवसांपासून प्रचारात व्यस्त आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही जोरदार प्रचार केला. या प्रचारात जनतेला अनेक आश्वासनेही देण्यात आली. महायुतीतच सभांची स्पर्धा रंगलेली पहायली मिळाली. महायुतीतील कोणत्या नेत्याने किती स्पर्धा घेतल्या ते जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 37 सभा घेतल्या, तसेच त्यांनी काही ऑनलाईन सभाही घेतल्या. फडणवीस यांनी कोकण विभागातील डहाणू, पालघर, बदलापूर येथे सभा घेतल्या. तर छत्रपती संभाजीनगर विभागाती उदगीर, लोहा, हिंगोली, परतूर, पैठण, बीड, खुलताबाद या 7 ठिकाणी सभा घेतल्या. नागपूर विभागात उमरेड, वाडी, हिंगणघाट, भद्रावती, गडचिरोली, भंडारा, तुमसर, गोंदिया या ठिकाणावरील संभांना संबोधित केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावती विभागात यवतमाळ, वाशिम, हिवरखेड, धारणी, चिखली तसेच नाशिक विभागात जामखेड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगाव, पिंपळगाव बसमंत या 7 ठिकाणी सभा घेतली. तसेच पुणे विभागातील अक्कलकोट, सांगोला, चंदगड, कराड, उरुण ईश्वरपूर, भोर, आळंदी या ठिकाणीही सभांना हजेरी लावली होती.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यात 39 सभा घेतल्या आहेत. यात पुणे जिल्ह्यात 3 आणि बीड जिल्ह्यातील 2 सभांचा समावेश आहे. अजित पवारांच्या सर्व सभांना तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 23 जिल्ह्यात 53 प्रचारसभा आणि रोड शो घेतले आहेत. एकंदरीत पाहता एकनाथ शिंदे यांनी या प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. महायुतीतील या तिन्ही प्रमुख पक्षांनी काही ठिकाणी युती केली आहे, तर काही ठिकाणी हे पक्ष स्वतंत्र लढत आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चुरस पहायला मिळत आहे. आता या तिन्ही पक्षांपैकी कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.