मंत्री संदिपान भुमरे यांच्या कारखान्यावर टाच, साखर आयुक्तांकडून जप्तीचे आदेश

शेतकऱ्यांची तब्बल 17 कोटी 49 लाख रुपयांची देणी थकल्यामुळे भुमरेंच्या कारखान्यावर जप्ती आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Sandipan Bhumre Sugar Factory)

मंत्री संदिपान भुमरे यांच्या कारखान्यावर टाच, साखर आयुक्तांकडून जप्तीचे आदेश
फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

औरंगाबाद : शिवसेना नेते आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे (Sandipanrao Bhumre) यांचा साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संदिपान भुमरे यांच्या मालकीच्या औरंगाबादेतील कारखान्यावर टाच आली आहे. साखर आयुक्तांनी कारखाना जप्त करण्याचे आदेश काढले. (Maharashtra Minister Sandipan Bhumre action against Sugar Factory)

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात संदिपान भुमरे यांचा शरद सहकारी साखर कारखाना आहे. हा कारखान जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांची ऊसाची देणी थकल्यामुळे जप्तीचे आदेश काढल्याचे आरोप आहेत.

शेतकऱ्यांची देणी थकवल्याचा आरोप

शेतकऱ्यांची तब्बल 17 कोटी 49 लाख रुपयांची देणी थकल्यामुळे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्यावर जप्ती आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारखाना जप्त करुन शेतकऱ्यांची देणी देण्याचा आदेश साखर आयुक्तांनी दिला आहे. मात्र थकित रक्कम भरल्याचा दावा मंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे.

कोण आहेत संदिपान भुमरे?

संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत. ठाकरे कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.

प्रशांत बंब यांच्यावर साखर कारखाना घोटाळा

गंगापूर साखर कारखाना घोटाळाप्रकरणी भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच वैजापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणातील सभासदांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणातील सहा सदस्यांनी वैजापूर जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. (Maharashtra Minister Sandipan Bhumre action against Sugar Factory)

जामीन नाकारल्यामुळे सभासदांवर अटकेची टांगती तलवार आहे. सभासदांचा जामीन नाकारल्यामुळे आमदार प्रशांत बंब यांचाही जामीन अधांतरी आहे. सभासदांना जामीन मिळत नसल्यामुळे प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.

माझ्याविरोधात कट, प्रशांत बंब यांचा दावा

गंगापूर साखर कारखाना घोटाळाप्रकरणी माझ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा या कटाचा भाग आहे. गंगापूर साखर कारखाना हडप करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यातील सर्वोच्च नेत्याने दबाव आणला असल्याचा धक्कादायक आरोपही प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषदेत केला.

संबंधित बातम्या :

‘पश्चिम महाराष्ट्रातील नेते मला टार्गेट करतायत; राज्यातील सर्वोच्च नेत्याच्या दबावामुळे माझ्यावर गुन्हा दाखल’

तुम्हालाही विहीर खोदायचीय, रोहयो मंत्री संदिपान भुमरेंची मोठी घोषणा

(Maharashtra Minister Sandipan Bhumre action against Sugar Factory)

Published On - 8:54 am, Sat, 13 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI