Maharashtra News LIVE : टीएमसीच्या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पक्ष विलीनीकरणाचे पत्र केले सादर
अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराची नवी अपडेट, पंढरपुरात रोहित पवारांच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील देणार भेट; तसेच मुंबई आणि नाशिकमधील हवामानाचा 'यलो अलर्ट' यांसह महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी.

राज्यात आज राजकीय घडामोडींसह हवामानाचा पाराही चांगलाच तापलेला पाहायला मिळत आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार हर्षदजित देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते मंगळवारपासून प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे वंचितला पाठिंबा देण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी देशमुखांवर केलेल्या कोट्यवधींच्या आरोपामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे, पंढरपुरात रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास रोहित पवार यांनी नामदेव पायरी येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे; या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील, महादेव जानकर आणि राजू शेट्टी आज भेट देणार आहेत. दरम्यान, हवामान विभागाने नाशिक, मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण पट्ट्यात उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मान्सूनची प्रगती रखडल्यामुळे राज्यात प्रचंड उकाडा वाढला असून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही हैराण झाले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
पंतप्रधान मोदी 20 जून रोजी राष्ट्रपती मुर्मू यांच्या गावाला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशातील राष्ट्रपती मुर्मू यांच्या सासरच्या गावाला भेट देणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान २० जून रोजी ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील राष्ट्रपतींच्या सासरच्या पहारपूर या गावाला भेट देतील आणि विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील.
-
पाटणा: बिहारच्या महाधिवक्त्यांचा राजीनामा
बिहारचे महाधिवक्ता पी. के. शाही यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये महाधिवक्ता म्हणून काम केले होते. ते नितीश कुमार सरकारमध्ये माजी शिक्षणमंत्रीही होते.
-
-
वसईमध्ये एका महिलेने विजेच्या खांबावर चढून आत्महत्येचा केला प्रयत्न
वसई येथील सुरक्षा स्मार्ट सिटी मधुबन संकुलात एका महिलेने उच्च दाबाच्या विजेच्या टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि बचाव पथकाच्या तत्परतेमुळे त्या महिलेला सुखरूप खाली आणण्यात आले.
-
टीएमसीच्या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पक्ष विलीनीकरणाचे पत्र केले सादर
बंडखोर टीएमसी खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पक्ष विलीनीकरणाचे पत्र सादर केले. टीएमसी खासदार काकोली घोष म्हणाल्या, “आम्ही एनडीएचा भाग म्हणून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करू. आमच्याकडे दोन-तृतीयांश बहुमत असून आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही टीएमसीबद्दलच्या आमच्या तक्रारी अध्यक्षांकडे मांडल्या आहेत.”
-
धुळ्यात शिरपूर शहरातील फळांच्या गोदामाला आग, सामान जळून खाक
धुळे : शिरपूर शहरातील भंडारी टॉपिक परिसरात हिंदुस्तान फळांच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमध्ये केळीचे कॅरेट, मोटरसायकल, संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. शिरपूर अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी दाखल झाले असून आग नियंत्रणात आली आहे.
-
धाक दाखवून सत्ताधारी पक्ष निवडणूक लढवतात, अंबादास दानवे यांचा आरोप
परभणी : पैशाचा माज सत्तेची मस्ती मोठ्या प्रमाणात आली असं म्हणत आंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. कोणाला धाक कोणाला धमकावून तर कोणाला प्रलोभन देऊन सत्ताधारी पक्ष सध्या निवडणूक लढवत असल्याचं मत आंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.
-
गोकुळ गीतेंची नाशिक निवडणुकीतून माघार, पण सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
गोकुळ गीतेंची नाशिक निवडणुकीतून माघार, पण सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
एकीकडे महायुतीतील मतदारांचे विभाजन होऊ नये, यासाठी सहलीचे आयोजन सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल
गोकुळ गीते यांनी आपला प्रचार थांबवत माघार जाहीर केली असली तरी देखील मात्र पाठिंब्या बाबत कुठलीही स्पष्ट वक्तव्य नाही
गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला असला तरी समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रचार सुरूच
प्रचार थांबवला पण उमेदवारी आजही आहे, अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल
-
मनोज जरांगे पाटलांनी घेतली रोहित पवारांची भेट
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर रोहित पवार यांचं आंदोलन
आज आंदोलनाचा तिसरा दिवस
रोहित पवार यांची तब्येत खालावली, बीपी शुगर लो
मनोज जरांगे पाटील यांनी घेतली रोहित पवार यांची भेट
-
पंढरपूर : रोहित पवार यांचा सलाईन लावण्यास नकार
शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार हे पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करत आहेत. सध्या त्यांचे ब्लड प्रेशर आणि साखर ड्रॉप होत असल्याने डॉक्टरांनी सलाईन लावण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र रोहित पवार यांनी जोपर्यंत मंत्री येऊन चर्चा करत नाहीत, तो पर्यंत सलाईन लावणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
-
अमरावती : 67 वर्षीय वृद्धाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
अमरावतीच्या अंजनगाव सूर्जी तालुक्यातील विहीगाव येथे 67 वर्षीय वृद्धाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दादाराव भगाजी अभ्यंकर असं संबंधित वृद्धाचे नाव आहे. दादाराव अभ्यंकर हे शेत शिवारात पाणी देत होते. दरम्यान तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना विष पाजल्याची माहिती समोर आली आहे. सध्या अभ्यंकर यांची प्रकृती अत्यवस्थ असून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
-
लातूर : कार आणि क्रुझरच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातल्या औसा शहरा जवळ कार आणि क्रुझर जीपच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. क्रूझर जीपला क्रेटा जीपने पाठीमागून जोराची धडक दिली. यामुळे जीप रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात जीप मधील एक आणि कार मधील दोघांचा मृत्यू झाला आहे.
-
वाशिम : केशव नगर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
रिसोड तालुक्यातील केशव नगर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळपासून कडक ऊन पडलेले होते, मात्र दुपारनंतर हवामानात अचानक बदल वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे खरीप हंगामापूर्वी जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
-
अमरावती परिषदेच्या काँग्रेस उमेदवाराला रुग्णालयातून डिस्चार्ज
अमरावती परिषदेच्या काँग्रेस उमेदवाराला रुग्णालयातून डिस्चार्ज. हर्षजीत देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मी अजूनही निवडणूक रिंगणात असून ऑनलाईन प्रचार करणार- हर्षजीत देशमुख
-
बुलढाण्यातील प्रकल्पांमध्ये 22 टक्के जलसाठा शिल्लक
बुलढाण्यातील प्रकल्पांमध्ये 22 टक्के जलसाठा शिल्लक..खडकपूर्णा प्रकल्पात मृत साठा उरला..जून महिना अर्धा संपला तरीही जिल्ह्यात दमदार पाऊस नाही.. भविष्यात भीषण टंचाईची शक्यता.
-
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी तसेच विदर्भात काही ठिकाणी रविवारी आणि सोमवारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने उष्णतेमध्ये वाढ झाली आहे.
-
ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 9 खासदारांची उपस्थिती- राऊत
ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 9 खासदारांची उपस्थिती. प्रत्यक्ष 4 तर ऑलनाईन 5 खासदारांची बैठकीला उपस्थिती. ठाकरेंच्या 2 ते 3 खासदारांबद्दल संशयकल्लोळ. आम्ही सारे वाघच, राऊतांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा फेटाळल्या. आम्ही सारे वाघ, आता ऑपरेशन लांडगा राबवणार- राऊत
-
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ऑपरेशन टायगरसंदर्भात राजकारण करण्याची काही गरज नाही- प्रकाश सुर्वे
“खरं सांगायचं झालं तर ऑपरेशन टायगरसंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि वारंवार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला याचं राजकारण करण्याची काही गरज नाहीये. त्यांनी आत्मचिंतन करावं की त्यांचे खासदार आमदार त्यांना का सोडून जातात? त्या मागची नेमकी कारण काय याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करावं,” अशी प्रतिक्रिया प्रकाश सुर्वे यांनी दिली आहे.
-
कोस्टल रोड प्रकल्प गेमचेंजर ठरणार- प्रकाश सुर्वे
“कोस्टल रोड हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. याचं कम वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रकल्प गेम चेंजर ठरेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कोस्टल रोडची पाहणी केली. मी सुद्धा या दौऱ्यामध्ये होतो आणि सर्व अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत,” अशी माहिती प्रकाश सुर्वे यांनी दिली.
-
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीला खासदार संजय जाधव यांची दांडी
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली. खासदार संजय जाधव हे धोंडे जेवण कार्यक्रमाच्या निमित्ताने कीर्तनात व्यस्त होते. संजय जाधव हे बैठकीला दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे.
-
मनसैनिकांतर्फे रिक्षा चालकांच्या रिक्षाच्या CNG टाक्या फुल
चिपळूणमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक विभागातर्फे आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील सीएनजी पंपावर रिक्षाचालकांना मोफत सीएनजी गॅस भरून देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
-
परभणी शहरातील बालाजी मंदिराची जमीन जिल्ह्यातील नेत्यांनी लाटल्याचा आरोप
परभणी शहरातील बालाजी मंदिराची 24 एकर जमीन जिल्ह्यातील नेत्यांनी लाटल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. भाजप नेते बाळासाहेब जाधव यांचा उबाठाचे खासदार संजय जाधव यांचं नाव न घेता आरोप केला आहे. कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी तक्रारदाराला मॅनेज करत बंडल हडपल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. बाळासाहेब जाधव हे खासदार संजय जाधव यांचे सख्खे बंधू असून भावावर नाव न घेता केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
-
आमदार रोहित पवारांची तब्येत स्थिर
आमदार रोहित पवारांची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आमदार रोहित पवारांचे ब्लड प्रेशर सह रक्तातील साखर नियंत्रण रेषेवर आहे. आमदार रोहित पवाराना थकवा जाणवत असून , डी- हायड्रेशनचाही त्रास होत असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉक्टरांकडून आमदार रोहित पवारांना कमी बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. साखरेच्या प्रमाणामध्ये चढ उतार होत आहे.
-
मुख्यमंत्र्यांसोबत रहिवाशांची सेल्फी
नॉर्थ कोस्टल रोडच्या पाहणी दौऱ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी स्थानिकांची गर्दी झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांसमोर जय श्री रामचे नारे दिल्यानंकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक रहिवाशांसोबत सेल्फी काढला
-
पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर बैठक
राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुण्यातील सिंचन भवन येथे आढावा बैठक सुरू झाली आहे. राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठा संदर्भात तसेच पुण्यातील पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर आढाव बैठक सुरू झाली आहे.
-
भीमाशंकर येथील विकास कामं लवकर पूर्ण करण्यावर भर-सुनेत्रा पवार
भीमाशंकर ला चांगल दर्शन झालं त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत. इथे विकास आराखड्याची पाहणी करण्यासाठी मी कालच येणार होते मात्र मला काल भीमाशंकर ला यायला जमलं नाही म्हणून मी आज आले आज मी आराखडा पाहायला आले त्यामुळे राजकीय काही प्रश्न नको. भाविकांची सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विकास कामे सुरू आहेत ती लवकरात लवकर कशी पूर्ण होतील असे आमचे प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
-
17 ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील
विधानपरिषद निवडणुक फक्त औपचारिकतापूर्ती राहिली आहे. जळगाव महायुतीचा बालेकिला आहे हे सिद्ध करण्यासाठी १८ तारखेला प्रत्येकाने मतदान करायचे आहे.. मतदान करताना अनेक जण गांभीर्यपूर्वक मतदान करत नाही त्यामुळे मतदानात चूक होते. मतदानाबाबत रवींद्र चव्हाण यांच्याकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येकाने ओळखपत्र घेऊन जावे, पेन घेऊन जाऊ नये, नजरेचा चष्मा असलेल्यांनी चष्मा घालून जावे, मतपत्रिकेची घडी , अशा बारीक बारीक गोष्टींवर रवींद्र चव्हाण यांची भाषणातून मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वा महाराष्ट्र मध्ये सर्व 17 ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा दावा चव्हाण यांनी केला.
-
ओमराजे निंबाळकर खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत
मुलाच्या तब्येतीच्या कारणामुळे ओमराजे निंबाळकर खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. अनिल देसाईंकडे याबाबत निरोप दिला असल्याची माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. ऑफलाइन किंवा ऑनलाईन कोणत्याही पद्धतीने बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मुलाच्या तब्येतीच्या कारणास्तव ओमराजे निंबाळकर पुण्यात आहेत.
-
महाराष्ट्रातील शेतकरी आता एकवटत आहे-राजू शेट्टी
शेतकऱ्यांसाठी आम्ही नागपूर येथे हायवे बंद करून केलेल्या आंदोलनामुळे सरकार गुडघ्यावर टेकले होते. वचन नाम्यात सातबारा कोरा असे आश्वासन देऊन मते घेतली होती. एक तर बाप दाखवा नाहीतर श्राद्ध झाला तुम्ही आश्वासन दिली होती मग ती का दिली होती. महाराष्ट्राच्या तिजोरीची खडा न खडा सगळी माहिती असताना देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बाजूने का निर्णय घेत नाही. बच्चू कडू कोठेही असले तरी या आंदोलनाच समर्थन त्यांना करावे लागेल. महाराष्ट्रातील शेतकरी आता एकवटत आहे असे राजू शेट्टी म्हणाले.
-
ऑपरेशन टायगरच्या चर्चेत तथ्य वाटत नाही- आमदार कैलास पाटील
ऑपरेशन टायगरच्या चर्चेत तथ्य वाटत नाही, या कायम चर्चा आहेत. मुलाची तब्येत बरी नसल्याने खासदार उमराजे निंबाळकर पक्षाच्या बैठकीला हजर नव्हते त्यांनी तसं कळवलं ही होतं. ठाकरे शिवसेनेचे काही खासदार शिवसेनेच्या संपर्कात अशी आमदार अंबादास दानवे यांनी कबुली दिली मात्र ते त्यांनाच माहीत असे आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे.
-
शिपिंग कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कांदा निर्यातदारांचे कोट्यवधींचे नुकसान
शिपिंग कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कांदा निर्यातदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. श्रीलंका निर्यातीतील ६५ कंटेनर कांदा नाकारले आहेत. व्यापाऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. दुबईकडे पाठवलेले कांद्याचे जहाज महिनाभरापासून अडकले असल्यामुळे निर्यातदार चिंतेत आहेत.
-
अडाण नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
वाशिम येथील अडाण नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. इंझोरी येथील गोमुखेश्वर संस्थान परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. शुभम धोंडे (14) व दर्शन वावगे (20) यांचा मृत्यू झाला आहे. नदीतील खोल खड्ड्यात गेल्याने दोघेही बुडाले.
-
माथेरानची राणी १५ जूनपासून पावसाळी सुट्टीवर
माथेरानची राणी १५ जूनपासून पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा मिनी ट्रेन धावणार आहे. २८१ वळणांचा प्रवास आता चार महिने थांबणार आहे. नेरळ–माथेरान मिनी ट्रेन सेवा १५ जूनपासून बंद होणार आहे.
-
कालपासून भाजप विधान परिषद मतदारांच्या भेटीगाठी सुरू
काल पश्चिम विधानसभा मध्य विधानसभा मधील नगरसेवकांच्या भेटीगाठी झाल्या आज पूर्व विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आलो आहोत. प्रचाराचा एक भाग आहे उमेदवारांसोबत मी भाजप शहर अध्यक्ष म्हणून आलो आहे असे भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटलं आहे.
-
पुण्यासह राज्यभरात पाणीटंचाईचं संकट दूर होऊन भरभरून पाऊस पडावा यासाठी पुण्यात प्रजन्ययागाचे आयोजन….
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणात कमी पाणीसाठा आहे.यामुळे सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. पुणेकर नागरिकांची या पाणी कपातीमधून सुटका व्हावी तसेच भरभरून पाऊस व्हावा यासाठी पुण्यात ‘पर्जन्ययाग’ चे आयोजन केले.
-
राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त चारकोपमध्ये मनसेचा उपक्रम – पेट्रोलवर 5 रुपये सूट
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना चारकोप विधानसभेकडून नागरिकांसाठी विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. सेक्टर 6, काडसिद्धेश्वर रोडवरील भारत पेट्रोल पंप येथे मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरणाऱ्यांना एक लिटरमागे 5 रुपये सूटचे कुपन दिले जात आहे. ही सवलत फक्त सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच लागू असेल. सदर कुपन याच पेट्रोल पंपावर मिळतील.
-
जळगावमध्ये विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे उपस्थितीत महायुतीचा मेळावा
महायुतीच्या मेळाव्याला जिल्हाभरातून येणाऱ्या प्रत्येक नगराध्यक्ष व नगरसेवकाची उपस्थिती असल्याची प्रवेशद्वारावरच नोंद घेतली जात आहे. महायुतीचा नगरसेवक तसेच नगराध्यक्ष फुटू नये तसेच प्रत्येकाची नोंद राहावी यासाठी भाजपकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रवेशद्वारावरच कार्यकर्त्यांकडून मेळाव्याला आलेल्या प्रत्येक नगराध्यक्ष तसेच नगराध्यक्षाची रजिस्टरमध्ये स्वाक्षरीसह नोंद घेतली जात आहे.. महायुतीमध्ये पक्षांमध्ये असलेली अंतर्गत नाराजी यामुळे मतदार फुटू नये यासाठी भाजपच्या वतीने प्रत्येकाची नोंद घेत खबरदारी घेत जात असल्याचे चित्र दिसत आहे.
-
जळगावच्या चोपडा शहरात आयसर गाडी अडवून चालकाला मारहाण गाडीची तोडफोड केल्याची घटना
जळगावच्या चोपडा शहरात आयसर गाडी अडवून चालकाला मारहाण गाडीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही तरुणांनी गाडी अडवून गाडीचे टायर लोखंडी रॉडने फोडले आणि चालकाला गाडीत काय आहे, अशी विचारणा करत अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. गाडीत ‘गोवंश’ असल्याचे खोटे आरोप करत तरुणांनी लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली आणि गाडीचेही नुकसान केले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्सोवा ते भाईंदर प्रस्तावित नॉर्थ कोस्टल रोडची पाहणी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्सोवा ते भाईंदर प्रस्तावित नॉर्थ कोस्टल रोड प्रकल्पाच्या विविध टप्प्यांची प्रत्यक्ष पाहणी करणार. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, सर्व अधिकार्यांना हजर राहण्याचे आदेश. मुख्यमंत्र्यांनी काल भीमाशंकर परिसरातील विकासकामांची पाहणी केली होती. त्यानंतर आज मुंबईतील महत्त्वाकांक्षी नॉर्थ कोस्टल रोड प्रकल्पाचा आढावा घेण्यात येणार. मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा सकाळी 11.40 वाजता अंधेरी पश्चिम येथील मॅग्नम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीपासून सुरू होईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता वर्सोवा येथील अमरनाथ टॉवर परिसराला भेट देऊन तेथील प्रकल्पाची प्रगती तपासली जाईल. पुढे दुपारी 12.25 वाजता लोखंडवाला, 12.50 वाजता मालाड, दुपारी 1.15 वाजता चारकोप येथील मरिना एन्क्लेव तसेच दुपारी 1.45 वाजता चारकोप सेक्टर-8 परिसरात पाहणी केली जाणार आहे.
-
खेळताना गळफास लागून 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
प्रतापनगर हद्दीतील शेवाळकर अपार्टमेंटमध्ये घटनेमुळे शोककळा. मल्हार अनमोल रंगारी (वय 11) अस मृतक मुलांचं नाव. घरात खेळत असताना खिडकीला बांधलेला पट्टा गळ्यात टाकल्याची माहिती. चाके असलेल्या खुर्चीवर उभा असताना तोल गेल्याचा प्राथमिक अंदाज. खुर्ची सरकल्याने गळ्यातील पट्टा आवळला गेला. घटनेवेळी आई-वडील नोकरीवर, मुलगा घरात होता. अपघाती स्वरूपाची घटना असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज, प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली
-
जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर पेठ व कसबेत भीषण पाणीटंचाई
पाणीपुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची मोठी झुंबड. पहूर पेठ व कसबे गावांमध्ये तब्बल महिनाभरानंतर पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती. पहूर पेठ व कसबे गावाला देवळी आणि गोगडी जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो मात्र, दोन्ही जलाशयांतील पाणीसाठा पूर्णपणे संपल्याने गावांमध्ये टंचाई
-
कोल्हापूर जिल्ह्याला बसत आहेत पाणीटंचाईच्या झळा
कोल्हापूर प्रमुख धरणांमधल्या पाणी पातळीत कमालीची घट. राधानगरी धरणात 26 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी आजच्या दिवशी राधानगरी धरणात होता तब्बल ५३ टक्के इतका पाणीसाठा. घटलेला पाणीसाठा आणि लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी धरणातून दूधगंगा नदीत होणारा विसर्ग पूर्णपणे थांबवला. पाणी पातळी घटल्याने राधानगरी धरणातील छोटी बेट झाली उघडी
-
धारावीत गुंडांच्या मदतीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न- संजय राऊत
धारावीत गुंडांच्या मदतीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अदानीकडून केला जात आहे. धारावीत गंभीर वातावरण असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यांना कोण घाबरते.. ज्यादिवशी अमित शहा सत्तेत नसतील त्यादिवशी यांच्या चड्ड्याखाली येतील..
-
रोहितळ येथे अवैध दारू विक्रीविरोधात महिला आक्रमक
अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करा- रोहितळ ग्रामपंचायतीचे तलवाडा पोलीस स्टेशनला पत्र. रोहितळ येथील अवैध दारू विक्री अड्ड्यावर महिलांनी दाखल होत दारूच्या बाटल्यांची केली तोडफोड. लगेच कारवाई करा अशी पोलिसांकडे केली मागणी, या दरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
-
अधिक मासानिमित्त बालाजी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
अधिक मासाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ऐतिहासिक बालाजी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळत आहे. अधिक मासानिमित्त मंदिर प्रशासनाकडून पहाटेपासूनच भाविकांसाठी मंदिराचे द्वार खुले केले जात असून, पहाटे साडेपाच वाजेपासून सुरू होणाऱ्या काकड आरतीला आणि विधीवत पूजेला मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. या पवित्र महिन्यात बालाजी चरणी लीन होण्यासाठी महिलांसह पुरुष भाविक पहाटेपासूनच मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावत असून, संपूर्ण धरणगाव परिसर सध्या भक्तीमय वातावरणाने भारावून गेला आहे.
-
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; १५ शस्त्र परवाने रद्द, ६८ नवीन अर्ज फेटाळले
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी विविध कारणांमुळे १५ शस्त्र परवाने रद्द केले असून, नवीन परवान्यासाठी आलेल्या ६८ जणांचे अर्ज फेटाळून लावले आहेत. परवाना रद्द झालेल्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी व शस्त्राचा गैरवापर करणाऱ्या ५ जणांचा, परवाना मिळूनही मुदतीत शस्त्र खरेदी न करणाऱ्या २ जणांचा, तर वृद्धत्व किंवा मृत्यू झालेल्या ८ परवानाधारकांचा समावेश आहे. दरम्यान, नवीन अर्जांची छाननी करताना अर्जदारांकडे शस्त्र बाळगण्यासाठी कोणतेही सबळ कारण नसल्याचे समोर आल्याने ६८ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
-
मुख्यमंत्री आंदोलनाबाबत गंभीर नाहीत, अजितदादांची आठवण येतेय; रोहित पवारांचा प्रशासनाला इशारा
पंढरपूर: “मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे आणि आमचे अन्नत्याग आंदोलन गांभीर्याने घेत नाहीत; ते तहसीलदारांमार्फतही संपर्क साधू शकले असते, पण बोलत नाहीत. अशा वेळी मला अजितदादांची आठवण येते, ते असते तर सर्वात आधी भेटायला आले असते,” अशा भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या. आंदोलनाचा तिसरा दिवस असून रक्तातील साखर कमी झाली तरी आपण लढत असल्याचे त्यांनी सांगितले. आज निर्णय न झाल्यास उद्या सकाळी विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरीवर आंदोलन सुरू करू आणि राज्यभर कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, ज्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, आज आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील, संजय राऊत, राजू शेट्टी यांच्यासह दिल्लीतील नेत्यांची हजेरी लागणार असून, टीका करणाऱ्यांना अधिवेशनात उत्तर देणार असल्याचे पवार म्हणाले.
-
नाशिक शहर व परिसरात उकाड्याने नागरिक हैराण; आज वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’
नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्मा आणि रात्रीचा उकाडा अद्यापही कायम असल्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. दरम्यान, कुलाबा वेधशाळा आणि हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्यासाठी आज पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, जिल्ह्यातील काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, या पावसामुळे नागरिकांना कडक उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
-
त्र्यंबकेश्वरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल नष्ट
नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत त्या पूर्णपणे नष्ट केल्या आहेत. या धडक मोहिमेदरम्यान तब्बल ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, परिसरात चालणाऱ्या अवैध दारू धंद्यांविरोधात प्रशासनाने उगारलेल्या या बडग्यामुळे बेकायदेशीर दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
-
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता
पुणे: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पुढील दोन दिवसांत नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी, तर विदर्भात काही ठिकाणी रविवारी आणि सोमवारी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी दुपारच्या वेळी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
महागड्या इंधनाचा फटका, विमानांची उड्डाणे घटली; मुंबई, दिल्लीसह अनेक मार्ग प्रभावित
नागपूर: विमान इंधनाच्या (ATF) वाढत्या किमती आणि संचालन खर्चामुळे नागपूरहून चालणाऱ्या विमान सेवांवर मोठा परिणाम झाला असून कंपन्यांनी अनेक मार्गांवरील उड्डाणांमध्ये कपात केली आहे. याचा सर्वाधिक फटका नागपूर-इंदूर मार्गाला बसला असून १५ जूनपासून या मार्गावरील दैनंदिन सेवा स्थगित करण्यात आली आहे, जी १८ जूनपासून आठवड्यातून केवळ पाच दिवस (मंगळवार आणि बुधवार वगळून) चालवली जाईल. याशिवाय, नागपूर-मुंबई आणि दिल्ली या मुख्य मार्गांवरील उड्डाणेही कमी करण्यात आली असून मुंबईसाठी आता केवळ पाच दैनंदिन उड्डाणे उपलब्ध असतील. इंडिगो कंपनीने १५ जूननंतर नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला असून यादरम्यान बंगळुरू आणि हैदराबादसाठीची विमान सेवा १५ जूनपासून तर नागपूर-कोलकाता मार्गावरील बुधवारची सेवा १० जूनपासूनच स्थगित करण्यात आली आहे.
-
रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस, आज निर्णय न झाल्यास नामदेव पायरीवर आंदोलनाचा इशारा
पंढरपूर: कर्जत-जामखेडमधील प्रलंबित एमआयडीसीच्या (MIDC) प्रश्नावरून आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आंदोलनामुळे पंढरपुरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आज संध्याकाळपर्यंत सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर उद्यापासून थेट विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी महाद्वार येथे आंदोलन सुरू करण्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि रोहित पवार यांची भेट घेण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज दुपारी आंदोलन स्थळी उपस्थित राहणार असल्याने या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.