Maharashtra News LIVE : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील नेत्यांवर नाराज – सूत्र
Maharashtra News LIVE Updates : आमदार दीपक केसरकर यांच्यासह पक्षातील दोन मंत्र्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात केसरकर यांच्यावर विविध आरोप होत आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
गडचिरोलीत जंगल परिसरात मोठी आग; वनविभागाची धाव
गडचिरोली जिल्ह्यातील चात गाव जंगल परिसरात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. धानोरा, कुरखेडा आणि कोरची भागात सक्रिय असलेले वनतस्कर सागवान वृक्षांची तस्करी करण्यासाठी जाणीवपूर्वक झाडांना आग लावून ती पाडतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री लागलेली ही आग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. या घटनेमुळे वनतस्करांच्या नवनवीन क्लृप्त्या आता प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत.
-
आसामच्या निवडणुका भाजपच जिंकणार – देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात नक्षलवाद संपलाय. आसामच्या निवडणुका भाजपच जिंकणार, काँग्रेस निवडून येणार नाही हे जनतेलाही माहिती आहे, देशातील लोकांचा काँग्रेसवर विश्वास नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
-
मुक्ताईनगर, भुसावळ आणि बोदवड परिसरात अवकाळीसह गारपिटीचा तडाका, बळीराजा संकटात
मुक्ताईनगर, भुसावळ आणि बोदवड तालुक्यात काल झालेल्या भीषण अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली ज्वारी, मका आणि इतर पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मुलाप्रमाणे जपलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले, अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत. आधीच आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेली महागाई आणि मागील नुकसानीची अद्याप न मिळालेली मदत, अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
-
अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेती पिकाला फटका
अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारो हेक्टरवर शेती पिकाला फटका बसला आहे. पैठण तालुक्यातील कांदा बीज उत्पादक बागा भोई सपाट, डाळिंबाच्या बागाही आडव्या झाल्या . काढणीला आलेला गहू मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं असून – नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
राहाता / अहिल्यानगर – वादळाने विजेची तार कोसळून 9 गाईंचा मृत्यू
राहाता / अहिल्यानगर – वादळाने विजेची तार कोसळल्यामुळे 9 गाईंचा मृत्यू झाला. राहाता तालुक्यातील पाथरे गावात ही दुर्दैवी घटना घडली. काल संध्याकाळी जोरदार वादळी पाऊस झाला, ज्यामुले शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. संजय घोलप यांच्या गोठ्यातील नऊ गाई मृत्यूमुखी पडल्या.
-
-
जळगाव- वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्र उडून गेल्याने नुकसान
जळगावच्या धरणगाव तालुक्यात काल सायंकाळी तसेच रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. जोरदार वादळी वाऱ्यामुळे झूरखेडा येथे सुमनबाई गायकवाड यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पत्रे उडाल्यामुळे पावसामुळे घरातील धान्य तसेच इतर वस्तू भिजल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
-
चारकोप गावात एलपीजी गॅस सिलिंडरसाठी लोकांची प्रचंड गर्दी
चारकोप गावात एलपीजी गॅस सिलिंडरसाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. काल गॅस सिलिंडर न मिळाल्याने संतप्त लोकांनी याच ठिकाणी गोंधळ घातला होता.
आणि आजही चारकोप गावात सकाळपासून लोक एचपी गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे आहेत.
-
वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी आज होणार सेवानिवृत्त
महापौर अजीव पाटील यांच्या पुढाकारातून आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांचा सोमवारी पालिकेच्या महासभेत सेवानिवृत्तीचा सत्कार करून, त्यांचा निरोप समारंभ पार पडला आहे. तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडी ने अटक केल्या नंतर मनोजकुमार सूर्यवंशी यांनी 8 महिन्यांपूर्वी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. वसई विरार ची डागालेल्या परिस्थिती मध्ये मनोजकुमार सूर्यवंशी यांनी प्रशासनाचे मनोबल वाढवून, शहराच्या विकासात्मक अनेक प्रोग्रॅम हाती घेऊन प्रशासनावर चांगली पकड बसविली होती.
-
भोंदू बाबा खरात प्रकरणात आणखी एक माहिती आली समोर
महिलांसाठी बाबा वापरायचा वेगळा मोबाईल. इतर भाविकांसाठी वेगळा मोबाईल असायचा. महिलांच्या नंबर साठी बाबाने घेतलेला वेगळा मोबाईल. कोणाला लक्षात येऊ नये यासाठी भोंदू बाबा खरातचा होता वेगळा पॅटर्न. महिलांसाठीच्या मोबाईल मध्ये होते फक्त महिलांचे नंबर. बाबाच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांचे नंबर सेव्ह केले होते वेगळ्याच नावाने..
-
अटल सेतूकडे वाहन चालकांची पाठ, थेट..
अटल सेतूवरून 26 महिन्यात दोन कोटी वाहनांनी प्रवास केला. दिवसाला 70 हजार ऐवजी केवळ 25 हजार 600 वाहनांचा प्रवास. 26 महिन्यात अटल सेतूवरून 1 कोटी 81 लाख 95 हजार हलक्या वाहनांनी प्रवास केला. हलक्या व्यावसायिक वाहनाची संख्या 5 लाख 98 हजार 525 इतकी नोंद. त्याचवेळी 12 लाख 6 हजार 73 मध्यम, जड आणि अवजड वाहनांचा अटल सेतूवरून प्रवास. त्यामुळे वाहनांची अपेक्षित संख्या गाठण्यात एम एम आर डी ए ला दोन वर्षांनंतर देखील यश आले नाही. अटल सेतूवरून प्रवास करताना भरमसाठ टोल भरावा लागतो तर वाशी टोल नाकाला हलक्या वाहनांना टोल माफी आहे
-
बीड जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. बीडच्या आहेर धानोरा गावात काढुन टाकलेल्या उन्हाळी बाजरीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रीच्या पावसाने ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. पिकावर केलेला खर्च देखील निघणार नाही त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
पावसात भिजून कांदा खराब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
चाकण बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला कांदा अचानक झालेल्या पावसामुळे भिजून खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आधीच कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसताना आता बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे हा फटका अधिकच तीव्र झालाय.बाजार समितीत आवश्यक सुविधा आणि पावसापासून संरक्षणाची योग्य व्यवस्था नसल्याने कांद्याच्या ढिगांवर थेट पावसाचं पाणी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.
-
मुंबई- टॅरो रीडिंगच्या नावाखाली महिलेची फसवणूक; पाच पुरुषांसह महिलांना अटक
मुंबईच्या आरे कॉलनी पोलिसांनी टॅरो रीडिंगच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पाच पुरुष आणि महिलांना अटक केली आहे. आरोपींनी महिलेला व्हिला नंबर 415, रॉयल पाम, आरे कॉलनी इथं बोलावलं आणि ड्रग्जच्या, वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवून दोन लाख रुपये देण्यास भाग पाडलं.
-
भोंदू बाबा अशोक खरातच्या ऑफिसची फॉरेन्सिक तपासणी
नाशिक- उद्या भोंदू बाबा अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे. तत्पूर्वी खरातच्या ऑफिसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. पोलिसांकडून सील केलेल्या ठिकाणी पुराव्यांचा शोध घेण्यात आला. फॉरेन्सिक टीमने भक्तांची नोंद असलेली वही जप्त केली. काळे पडलेले पेढे, काळ्या रंगांची फळे आणि संशयास्पद यंत्रे ताब्यात घेतली. पीडित महिलेला घटनास्थळी नेऊन क्राइम सीन रीक्रिएट करण्यात आला. कथित शोषण झालेल्या केबिनची सखोल तपासणी करण्यात आली.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व रुग्णालयांचे पुन्हा फायर ऑडिट होणार
छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व रुग्णालयांचे पुन्हा एकदा फायर ऑडिट होणार आहे. गजानन हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन आता सतर्क झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षा तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोहीम तातडीने हाती घेतली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
-
तुळजापुरात दर्शनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांकडून भाविकांची लूट
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची अल्पवयीन मुलांकडून लूट केली जात असल्याचं समोर आलंय. मंदिरामध्ये सोडतो असं म्हणत अल्पवयीन मुलं बाहेरच्या भाविकांकडून पैसे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. भाविकांना अल्पवयीन मुलं पुजारी असल्याचं सांगत देवीच्या दर्शनाला डायरेक्ट घेऊन जातो असं सांगून फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी हा सगळा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याचं चित्रीकरण केलं असता त्यात लहान मुलं, वयोवृद्ध भाविकांना दर्शनाला सोडतो असं सांगत पैशाचा व्यवहार देखील करत असल्याचं समोर आलं आहे.
-
अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी
अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोकळ्या जागेत असलेला शेतमाल भिजला आहे. सोयाबीन, तूर, गहूसह चना असलेले शेतमालाचे पोते पावसामुळे भिजले आहेत. पावसामुळे शेतमाल भिजल्याने शेतमाल खराब होण्याची शक्यता आहे.
-
भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नाशिक न्यायालयाची नोटीस
नाशिक- भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नाशिक न्यायालयाने नोटीस बजावत ७ एप्रिल रोजी नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मराठी भाषिकांबाबत केलेल्या वक्तव्यावरून प्रकरण तापलं असून मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. याआधी नोटीस बजावूनही उत्तर न दिल्याने न्यायालयाने पुढील आदेश दिला आहे. पोलिसांकडून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला आहे.
-
कल्याणचा ‘रील स्टार’ सुरेंद्र पाटील पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात
कल्याणचा ‘रील स्टार’ सुरेंद्र पाटील पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बलात्कार प्रकरणातून जामिनावर बाहेर येताच अवैध शस्त्रसाठ्यासह त्याला पुन्हा अटक करण्यात आली. पोलिसांनी घरातून 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तलवार-चॉपरचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. चपलांच्या स्टॅन्डमध्ये गुप्त कप्पा बनवून त्यात शिताफीने शस्त्र लपवले होते.
-
शिर्डीत येणाऱ्या इंडिगो विमानाचं सूरत विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
शिर्डीत येणाऱ्या इंडिगो विमानाचं सूरत विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. इंडिगोचं IGO 619Y हे विमान दिल्लीहून शिर्डीकडे येत होतं. मात्र खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे शिर्डी विमानतळावर त्याचं लँडिंग शक्य झालं नाही. यानंतर विमानाला येवला आणि वैजापूर परिसरात हवेतच होल्डवर ठेवण्यात आलं. विमान खूप खाली उडत असल्यामुळे स्थानिक घाबरले होते. बराच वेळ हवेत घिरट्या घातल्यानंतरही हवामानात सुधारणा न झाल्याने आणि इंधनाचा विचार करून पायलटने विमान सूरतला वळवलं. इंधन भरल्यानंतर रात्री उशिरा 11 वाजता विमान पुन्हा शिर्डीकडे रवाना झालं.
-
एकनाथ शिंदे हे आमदार दीपक केसरकर यांच्यासह पक्षातील दोन मंत्र्यांवर नाराज- सूत्र
एकनाथ शिंदे हे आमदार दीपक केसरकर यांच्यासह पक्षातील दोन मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे दीपक केसरकर यांच्यावर होत असलेले आरोप आणि काही जिल्ह्यांत पक्षाची घटलेली ताकद यामुळे शिंदे नाराज असल्याचे म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून काही मंत्र्यांची जबाबदारी बदलली जाऊ शकते.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे आमदार दीपक केसरकर यांच्यासह पक्षातील दोन मंत्र्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे दीपक केसरकर यांच्यावर होत असलेले आरोप आणि काही जिल्ह्यांत पक्षाची घटलेली ताकद यामुळे शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने शिंदे यांनी अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. याआधी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या काही नेत्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं समोर आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून काही मंत्र्यांची जबाबदारी बदलली जाऊ शकते. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.