Maharashtra News LIVE : मंत्र्यांची नावे जाहीर करा, अंधारे यांचे केसरकर यांना आवाहन

Maharashtra News LIVE Updates: अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार असून त्याला न्यायालयात हजर केले जाईल. तसेच जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅस आणि सिलिंडर टंचाई यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

Maharashtra News LIVE : मंत्र्यांची नावे जाहीर करा, अंधारे यांचे केसरकर यांना आवाहन
breaking news
| Edited By: | Updated on: Mar 29, 2026 | 10:26 PM

भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपत असून, त्याला आज तिसऱ्यांदा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मिरगाव येथील फार्महाऊसवर पोलिसांनी केलेल्या धाडीत आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी तिथून एक पिस्तूल, २१ जिवंत काडतुसे आणि ५ वापरलेली काडतुसे जप्त केली होती. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर रोकड, मौल्यवान वस्तू आणि जादूटोण्याशी संबंधित संशयास्पद साहित्यही हाती लागले आहे. पोलिसांनी जप्त केलेली सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि व्यवहारांच्या नोंदी असलेल्या डायऱ्यांमधून आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे, जागतिक युद्धाच्या सावटा मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवू लागले आहेत. गॅस आणि इंधन टंचाईमुळे अनेक ठिकाणी सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाढती मागणी आणि मर्यादित साठा यामुळे आगामी काळात गॅसच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील ठळक बातम्यांची अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Mar 2026 07:01 PM (IST)

    राजुर गणपती येथील रविवारच्या आठवडी बाजारात पुरवठा विभागाची छापेमारी

    भोकरदन तालुक्यातल्या राजुर गणपती येथील रविवारच्या आठवडी बाजारात आज पुरवठा विभागाने अचानक छापेमारी केली. या छापेमारीमध्ये आठवडी बाजारातल्या छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये वापरत असलेले दहा घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.

  • 29 Mar 2026 06:35 PM (IST)

    काळी जादूच्या संशयातून अपहरण; चार आरोपी अटकेत एक फरार

    काळी जादू केल्याच्या गैरसमजातून 62 वर्षीय सोलंकी यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या चार आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. भाईंदर पूर्व येथील हनुमाननगर परिसरात ही घटना घडली होती, या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती.

  • 29 Mar 2026 06:15 PM (IST)

    राज्यसभा खासदार मायाताई इवनाते यांचा नागरी सत्कार

    नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मायाताई इवनाते यांचा नागरी सत्कार कार्यक्रम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार

    थोड्या वेळात होणार कार्यक्रमाला सुरवात

  • 29 Mar 2026 05:54 PM (IST)

    जालना : पुरवठा विभागाची अचानक छापेमारी; 10 घरगुती गॅस सिलेंडर जप्त

    भोकरदन तालुक्यातल्या राजुर गणपती येथील रविवारच्या आठवडी बाजारात आज पुरवठा विभागाने अचानक छापेमारी केली. या छापेमारी मध्ये आठवडी बाजारातल्या छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये वापरत असलेले दहा घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मागच्या काही दिवसापासून बंद असल्याने अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसायिक घरगुती गॅस सिलेंडरचा छुप्या मार्गाने वापर करत असल्याने पुरवठा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

  • 29 Mar 2026 05:39 PM (IST)

    धनंजय देशमुख यांनी दिवंगत भाऊ संतोष देशमुखांचा मानेवर काढला टॅटू

    केज तालुक्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची 16 महिन्यांपूर्वी वाल्मीक कराडच्या टोळीने निर्घृण हत्या केली होती. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी भाऊ धनंजय देशमुख लढा देत आहेत. दरम्यान त्यांनी भाऊ संतोष देशमुखांचा फोटो टॅटूच्या माध्यमातून मानेवर कोरला आहे. त्या सोबत सत्य-विरा-युध्द असे नावं कोरले आहेत जी त्यांच्या मुलांची नावं आहेत.

  • 29 Mar 2026 05:30 PM (IST)

    मंत्र्यांची नावे जाहीर करा, अंधारे यांचे केसरकर यांना आवाहन

    दीपक केसरकर यांनी अनेक आमदारांची भोंदू खरातसोबत भेट घालून दिल्याचा आरोप आहे. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटले की, ‘केसरकर यांनी आमदार आणि मंत्र्यांची माहिती समोर आणली पाहिजेत, ते त्यांच्याकडे असलेली माहिती लपवत आहेत.’

  • 29 Mar 2026 05:14 PM (IST)

    सांगली : मंत्री झिरवळांचा व्हिडिओ काढणाऱ्याचा शोध घेऊन चौकशी करा

    मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याची चौकशी केली पाहिजे आणि यामागे कोण आहे हे तपासलं पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीत अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यातील व्हिडिओ शूट करणे हा गुन्हा आहे असं नायकवडी यांनी म्हटलं आहे.

  • 29 Mar 2026 05:12 PM (IST)

    विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

    विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील वर्कशॅापला भेट दिली. गाझियाबाद मध्येच बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बनवण्याचं काम सुरू आहे. यावेळी अण्णा बनसोडे यांनी इंदू मिल येथे बसवल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कामाची पाहणी केली.

  • 29 Mar 2026 04:57 PM (IST)

    महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता विराज जगताप याचा बदलापूरमध्ये अपघात

    महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता विराज जगताप याचा बदलापूरमध्ये अपघात झालाय. अपघातात विराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून स्पीड ब्रेकरवर पट्टे नसल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप विराजने केलाय. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.

  • 29 Mar 2026 04:46 PM (IST)

    परभणीत माती घेऊन जाणाऱ्या हायवा ट्रकची कारला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

    परभणी : माती घेऊन जाणाऱ्या हायवा ट्रकने कारला जोरदार धडक  दिल्याची घटना घडली. या अपघातामुळे कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कार वसमत वरून परभणीकडे येत असताना झिरो फाटा शिवारात ही घटना घडली आहे.  मयताचं नाव श्रीराम भिसे असल्याचं सांगण्यात आलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

  • 29 Mar 2026 04:24 PM (IST)

    परभणीत दोन गटांत मोठा वाद, पोलिसांचा चोख बंदोबस्त

    परभणीच्या सेलू शहरात सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान दोन गटात वाद झाला होता. वादानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच एसआरपीएफच्या टीमसह स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. या घटनेत अद्याप गुन्हे दाखल झाले नसले तरी मात्र सामाजिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे.
  • 29 Mar 2026 04:05 PM (IST)

    भंडाऱ्यात महिलेवर वाघाचा हल्ला, महिला कोमात

    भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील उमरझरी शिवारात रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास माया रामकृष्ण सोनवणे (वय 52) यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. मिरची तोडण्यासाठी गेलेल्या सोनवणे यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातली. त्यांच्या पतींनी आरडाओरड करून व हातातील थैली फेकून वाघाला पळवून लावले. जखमी महिलेला प्रथम साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून नंतर भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असूनही सदर महिला कोमामध्ये गेल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी नवेगाव-नागझिरा मार्गावर चक्का जाम आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आर्थिक मदतीच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी करण्यात आली.

  • 29 Mar 2026 03:48 PM (IST)

    मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर, शहर विकासावर मोठा भर – आमदार नरेंद्र मेहता

    “मिरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेने संतुलित अर्थसंकल्प सादर केला असून यात शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे.

  • 29 Mar 2026 03:35 PM (IST)

    प्रस्थापितांना संधी देणाऱ्या भाजपने भटक्या विमुक्तांना विधान परिषदेत संधी द्यावी…

    पंढरपूर याठिकाणी प्रस्थापितांना संधी देणाऱ्या भाजपने भटक्या विमुक्तांना विधान परिषदेत संधी द्यावी…. पंढरपुरातील भटक्या विमुक्त समाजाच्या बहुजन परिवार संवाद मेळाव्यात मागणी करण्यात आली. राज्यातील 53 विधानसभा मतदारसंघातील भटक्या विमुक्तांचे प्रतिनिधी म्हणून दौलत शितोळे यांना संधी द्या… भटक्यांना राज्यात संधी मिळावी म्हणून विठोबाला दुग्धअभिषेक करण्यात आला.

  • 29 Mar 2026 03:15 PM (IST)

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ

    कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.  पणन मंत्री जयकुमार रावल यांचे हस्ते भुमिपूजन करण्यात आलं.

  • 29 Mar 2026 03:03 PM (IST)

    जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हासंपर्क प्रमुख गजानन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक

    बैठकीदरम्यान पक्ष संघटन, सभासद नोंदणी, स्थानिक प्रश्न तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला आहे. निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने इच्छुक उमेदवार व स्थानिक तयारीबाबतचे सविस्तर अहवाल तातडीने संपर्क अध्यक्षांकडे सादर करावेत, असे निर्देश दिले आहेत. या बैठकीस संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील तालुका, शहर व ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 29 Mar 2026 03:00 PM (IST)

    डोंबिवलीत उद्धव ठाकरे शिवसेनेला जोरदार झटका

    डोंबिवलीत उद्धव ठाकरे शिवसेनेला जोरदार झटका दिला. शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. कल्याण डोंबिवलीत महापालिका निवडणुका संपताचा डोंबिवलीत ठाकरे गटाला जोरदार झटका बसला. उबाठाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांचा शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

  • 29 Mar 2026 02:50 PM (IST)

    कांदा उत्पादक शेतकर्‍यांना भरीव पॅकेज

    जगामध्ये जे युद्ध होते त्यामुळे कांदा आणि अनेक पिके अडचणीत आले. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि मी स्वतः सगळ्या प्रमुख लोकांना आमदारांना मंत्र्यांना बोलून एक बैठक घेतली. दोन दिवसांपूर्वी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कांद्या संदर्भातल्या दीर्घकालीन शॉर्ट आणि लॉन्ग टर्म मध्ये चर्चा झाली. तत्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे म्हणून कृषी सचिव, पणन सचिव, वित्तसचिव या तिघे सचिवांची एक समिती बनवण्यात आली. लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव पॅकेज देण्यात येणार असल्याचे जयकुमार रावळ म्हणाले.

  • 29 Mar 2026 02:40 PM (IST)

    परभणी जिल्ह्यात दोन गटात मोठा वाद

    सेलू शहरातील रहमान नगर भागात दोन गटात वाद झाला आहे. वादानंतर दोन गट आमने सामने आले आणि वादाच रूपांतर दगडफेक झाली. घटनेनंतर या परिसरात तणावाच वातावरन असून पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे . कुठल्याही फवावंवर विस्वास ठेऊ नये असं आव्हान पोलीसांकडून कारण्यात येत आहे .

  • 29 Mar 2026 02:30 PM (IST)

    नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात दुर्मिळ ग्रेट व्हाईट पेलिकन पक्ष्याचे आगमन

    नाशिकमधील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात रामसर दर्जा प्राप्त नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य येथे तब्बल २२ वर्षांनंतर दुर्मिळ ग्रेट व्हाईट पेलिकन पक्ष्याचे आगमन झाले. वन्यजीव विभागाकडून अधिकृत नोंद होईल. युरोप-मध्य आशियातून स्थलांतरित होणारा हा दुर्मिळ पक्षी आहे. परतीच्या प्रवासात अभयारण्यात मुक्कामला आला आहे.

  • 29 Mar 2026 02:20 PM (IST)

    अंबादास दानवे यांच्या क्रांती चौकातील कार्यालयाला पोलिसांचा मोठा बंदोबस्त

    जिल्हा परिषद सभापती निवडूच्या अनुषंगाने ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक बोलवण्यात आल्याने पोलिसांचा बंदोबस्त आहे. ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 18 कोटीचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता. ठाकरे शिवसेनेचा जिल्हाप्रमुखांनी जिल्हा परिषद सदस्य संजय निकम ललिता हॅलो सोनवणे हे भाजपाला मॅनेज झाल्याचा आरोप केला होता .

  • 29 Mar 2026 02:10 PM (IST)

    आधी कॅबिनेटमध्ये एकमत आहे की ते पहा

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की लॉकडाऊन आणि गॅस टंचाईची अफवा पसरवणे त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र मध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये मारामारी मेसेज लोक आजारी पडत आहेत. स्वतः तुमचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणतात गॅस टंचाई आहे असं भुजबळ म्हणत आहे. आधी कॅबिनेटमध्ये एकमत आहे की ते पहा असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.

  • 29 Mar 2026 02:00 PM (IST)

    धुळ्यातील ओम गॅस एजन्सीला कारणे दाखवा नोटीस

    धुळ्यातील ओम गॅस एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. ग्राहकांची प्रतीक्षा यादी यादी असताना ग्राहकांना वेळेत सिलेंडर न दिल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

  • 29 Mar 2026 01:55 PM (IST)

    रीलस्टार कुस्तीपटू सोनाली मंडलिकचा महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेतील पराभवानंतर कुस्तीला अखेरचा रामराम

    रीलस्टार कुस्तीपटू सोनाली मंडलिकने महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेतील पराभवानंतर कुस्तीला अखेरचा रामराम केला आहे. सोलापुरात महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पराभवानंतर सोशल मीडियावर तिने व्यथा व्यक्त केली आहे. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ओपनमध्ये निवड न झाल्यामुळे अहिल्यानगरची कुस्तीपटू सोनाली मंडलिकने कुस्तीला अखेरचा रामराम केला आहे.

  • 29 Mar 2026 01:45 PM (IST)

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्या पक्षात कुठलीही चर्चा नाही- अनिल देशमुख

    “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्या पक्षात कुठलीही चर्चा नाही. जेव्हा चर्चा होईल तेव्हा तुम्हाला सांगू. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार आहेत. जे प्रमुख मंडळी आहेत आणि त्यांच्या आमदारांनी जे वक्तव्य केलं, ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. आमच्या पक्षात कुठे काही चर्चा नाही. याबाबतीत आम्ही सगळे शांत आहोत. संघटना कशी मजबूत करावी, यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्रित काम करत आहोत, काही आमदार तशा भूमिका व्यक्त करत असतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत दिली.

  • 29 Mar 2026 01:28 PM (IST)

    खरातशी ज्या लोकांचे घनिष्ठ संबंध होते त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे- अनिल देशमुख

    “ज्यांचे घानिष्ठ संबंध होते, ज्या नेत्यांचं त्याच्याकडे जाणं-येणं होतं, बैठक होती, वारंवार त्याच्याकडे जायचे, त्याचा सल्ला घ्यायचे, त्याचे काही रेकॉर्ड आहेत. कोणत्या पक्षाचे किती आमदार आहे ते सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे याबाबतीत एसआयटी चौकशी सुरू आहे. योग्य ती चौकशी झाली पाहिजे. ज्या ज्या लोकांचे घनिष्ठ संबंध होते त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

  • 29 Mar 2026 01:13 PM (IST)

    धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेकडे पाटबंधारे खात्याचे पाणीपट्टीचे कोट्यवधी रुपये थकले

    धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेकडे पाटबंधारे खात्याचे पाणीपट्टीचे कोट्यवधी रुपये थकले आहेत. 31 मार्चपूर्वी पाणीपट्टी भरा, अन्यथा पाणी बंद करणार, असा इशारा पाटबंधारे खात्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. धुळे महापालिकेकडे तब्बल 11 कोटी 71 लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. जिल्ह्यातील साखरी नगरपंचायत, शिरपूर नगर परिषद, शिंदखेडा नगरपंचायत ,दोंडाईचा वरवाडे नगरपंचायत यांच्याकडे पण लाखो रुपयांची थकबाकी आहे.

  • 29 Mar 2026 12:59 PM (IST)

    महापालिका निवडणुका संपताच उबाठाला जोरदार झटका

    डोंबिवली महापालिका निवडणुका संपताच उबाठाला जोरदार झटका बसला आहे. उबाठाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांचा भाजपात प्रवेश. भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे.

  • 29 Mar 2026 12:45 PM (IST)

    मुक्त संचार करत असलेला बिबट्या वनविभागाकडून अखेर जेरबंद

    जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात मागच्या काही दिवसापासून बिबट्या मुक्त संचार करत असल्याचं काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं होतं. तेव्हापासून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला होता मात्र बिबट्या गुंगारा देत होता. त्यामुळे धावडा गावासह आसपासच्या परिसरात शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये मोठे भीतीचं वातावरण पसरलं होतं. परंतु शेवटी ड्रोनच्या सहाय्याने या बिबट्याचा शोध घेत वनविभागाने अखेर त्याला जेरबंद केलंय. दरम्यान बिबट्याला जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेसा मात्र निश्वास सोडला.

  • 29 Mar 2026 12:30 PM (IST)

    चोरी केलेला 1 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

    जालना शहरातल्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंठा बायपास रिंग रोडवर एका जेष्ठ वकिलाला काही अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी केल्याचा प्रकार घडला होता. सदरील वकिलाकडून चार जणांनी मोबाईल रोख रक्कम यासह कोर्टाच्या कामाची ब्रिफ केस हिसकावून घेतली होती. वकिलाने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेऊन हे चारही चोरटे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल आहे जप्त केला आहे

  • 29 Mar 2026 12:15 PM (IST)

    भोंदू अशोक खरातला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

    भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी कोर्टासमोर खरातला ‘मास्टरमाइंड’ म्हटले. पोलिसांनी आरोपीला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आता 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • 29 Mar 2026 11:55 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील 15 गावांत अशुद्ध पाणी पुरवठा

    जळगाव जिल्ह्यातील 15 गावांत अशुद्ध पाणी पुरवठा…. 7 तालुक्यांतील पाणी स्रोतांची स्थिती चिंताजनक… फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात पाण्याचे स्रोत दूषित आढळले…

  • 29 Mar 2026 11:45 AM (IST)

    विठ्ठल मंदिराला 11 हजार सूर्यफुलांची सजावट

    पंढरपुरात चैत्र एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला 11 हजार सूर्यफुलांची सजावट… सकाळपासूनच विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी… पहाटेच्या नित्य पूजेनंतर एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात…

  • 29 Mar 2026 11:35 AM (IST)

    इस्रायलकडून गाझामधील पोलीस चौक्यांवर बॉम्बहल्ला, 6 जण ठार

    इस्रायलकडून गाझामधील पोलीस चौक्यांवर बॉम्बहल्ला, 6 जण ठार. मृतांमध्ये 3 पोलीस आणि एका मुलीसह 3 नागरिकांचा समावेश. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे गाझा आणि वेस्ट बँक पॅलेस्टिनींवर हल्ले

     

  • 29 Mar 2026 11:25 AM (IST)

    रिक्षाला गॅस मिळत नसल्याने रिक्षाचालक पालकमंत्री संजय शिरसाटांच्या घरी

    रिक्षाला गॅस मिळत नसल्याने रिक्षाचालक पालकमंत्री संजय शिरसाटांच्या घरी. एलपीजी गॅस पंप चालक भाव वाढवून मनमानी करत असल्याचा रिक्षा चालकांचा आरोप. शिरसाटांनी पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारींना फोन लावला. पंप चालक मनमानी करत असतील तर लायसन्स रद्द करा, शिरसाटांच्या सूचना

     

  • 29 Mar 2026 11:17 AM (IST)

    भोंदू अशोक खरातला एसआयटीचे पथक महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतून घेऊन निघाले

    भोंदू अशोक खरातला एसआयटीचे पथक महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतून घेऊन निघाले कोर्टात….आज रविवार असल्यामुळे कोर्टाला सुट्टी असल्यामुळे विशेष कोर्टात केले जाणार हजर… महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ते कोर्टाचे चार ते पाच किलोमीटर चे अंतर… मोठा पोलीस बंदोबस्ता भोंदू अशोक खरातला एसआयटी चे पथक घेऊन जात आहे विशेष कोर्टात…

  • 29 Mar 2026 10:50 AM (IST)

    मुंबई आग्रा महामार्गावर रायगडनगर जवळ भीषण अपघात

    पहाटेच्या सुमारास इनोव्हा कारला अपघात. इनोव्हा चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुढे चालणाऱ्या ट्रक वर जाऊन धडकली. अपघातात एक जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी. जखमींना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल

  • 29 Mar 2026 10:40 AM (IST)

    नागपुरात विद्यार्थिनीची आत्महत्या प्रियकराला व्हिडिओ कॉल करून टोकाचा निर्णय

    हिंगणा परिसरातील डीएनडी हाइट्समध्ये घटना फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या. विध्येश्वरी आपटे (वय २३) मृतक विद्यार्थीनीचे नाव आहेय…ती मुळची वाशिम जिल्ह्यातील रहिवासी. आकार नर्सिंग कॉलेजची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी मैत्रिणींसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. घटनेच्या वेळी मैत्रिणी पदवीदान कार्यक्रमाला न जाता, ती फ्लॅटमध्ये एकटीच होती, आत्महत्येपूर्वी प्रियकराला व्हिडिओ कॉल कॉलदरम्यानच टोकाचा निर्णय घेतल्याच बोललं जातं आहेय… दोन दिवसांपूर्वी प्रियकराचे लग्न त्यामुळे मानसिक तणावात असल्याची चर्चा काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती…

  • 29 Mar 2026 10:30 AM (IST)

    संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

    सरकारमधील लोक गॅसवर आहेत, छगन भुजबळ म्हणतात की राज्यामध्ये गॅसटंचाई आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतंय की सर्व काय बरं आहे. सर्वात पहिले लॉकडाउन होणार आहे गुजरातचा लोकांना माहित पडले आणि मग सर्वात मोठी रांग गॅससाठी गुजरातला बघायला मिळाली.

  • 29 Mar 2026 10:20 AM (IST)

    लॉकडाऊनची अफवा गुजरातमधून आली- संजय राऊत

    संजय राऊत यांनी नुकताच मोठा आरोप करत म्हटले की, लॉकडाऊनची अफवा गुजरातमधूनच आली आहे. आज लोक रांगेत आहेत. राज्यातही गॅसचा तुटवडा आहे आणि गुजरातमध्येही गॅसचा मोठा तुटवडा आहे. सरकारमध्येच मोठे मतभेद असल्याचा मोठा दावा राऊतांनी केला.

  • 29 Mar 2026 10:05 AM (IST)

    सोलापुरात जुन्या वादातून शास्त्रीनगरमध्ये दोन गटांत तुफान हाणामारीची घटना

    ही हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झालीय. जुन्या वादातून दोन गटात कोयता, रॉड आणि फायटरचा वापर करून दोन्ही गटांनी एकमेकांवर केला प्राणघातक हल्ला. या मारहाणीत 5 जण गंभीर जखमी झालेत. यामध्ये परस्परविरोधी फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांनी दोन्ही गटाच्या फिर्यादीवरून 10 पेक्षा अधिक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

  • 29 Mar 2026 09:57 AM (IST)

    तुळजाभवानी चैत्र पौर्णिमा यात्रा, ५०० रुपयांचे स्पेशल दर्शन पास बंद; भाविकांसाठी २२ तास मंदिर खुले

    धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मंदिर संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी मोठे बदल केले आहेत. उद्यापासून मंदिर दररोज २२ तास दर्शनासाठी खुले राहणार असून, गर्दीचे नियोजन करण्यासाठी ५०० रुपयांचे स्पेशल दर्शन पास बंद करण्यात आले आहेत. ३१ मार्च ते ५ एप्रिल या काळात महाद्वारातून प्रवेश बंद असेल, तर भाविकांना कुंभार गल्लीतील झुलत्या पायऱ्यांवरून मंदिरात प्रवेश दिला जाईल. यात्रेच्या काळात चोवीस तास शिखर दर्शन उपलब्ध असेल आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना १२ तासांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत.

  • 29 Mar 2026 09:47 AM (IST)

    नागपूरचा डंका! ई-गव्हर्नन्स मोहिमेत महसूल आणि पोलीस विभागाची दमदार कामगिरी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

    महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ मोहिमेत नागपूर विभागाने प्रशासकीय सुधारणांमध्ये बाजी मारली आहे. लोकाभिमुख, तत्पर आणि पारदर्शक प्रशासनासाठी राबवलेल्या या मोहिमेत महसूल विभागाला प्रथम, पोलीस विभागाला द्वितीय आणि जिल्हा परिषदेलाही पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय कार्यपद्धतीत सुधारणा केल्याबद्दल नागपूरच्या या तिहेरी यशाचे कौतुक होत आहे.

  • 29 Mar 2026 09:37 AM (IST)

    मुद्रांक शुल्कात १० कोटींचा गोलमाल! कॅगचे ताशेरे; मुंबईत ५ टक्क्यांऐवजी २ टक्केच शुल्क आकारले

    राज्याच्या महसूल विभागात मुद्रांक शुल्काच्या (Stamp Duty) वर्गीकरणात मोठी हेराफेरी झाल्याची धक्कादायक बाब ‘कॅग’च्या (CAG) अहवालातून उघड झाली आहे. विक्रीच्या दस्तऐवजांचे ‘करारनामा’ असे चुकीचे वर्गीकरण करून मुद्रांक शुल्काचे दर कमी लावण्यात आले, ज्यामुळे राज्य सरकारला साडेदहा कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विशेषतः मुंबईतील बोरिवली-२ उपनिबंधक कार्यालयातील तपासणीत हा प्रकार उघडकीस आला असून, ५ टक्के शुल्काऐवजी केवळ २ टक्के शुल्काची आकारणी करण्यात आली आहे.

  • 29 Mar 2026 09:27 AM (IST)

    नाशिकचा भोंदू अशोक खरातला आज कोर्टात हजर करणार; पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता

    नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याची पाच दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. खरातवर आतापर्यंत एकूण ११ गुन्हे दाखल झाले असून, त्यात ९ महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे आणि २ फसवणुकीचे गंभीर गुन्हे आहेत. विशेष तपास पथकाने (SIT) गेल्या तीन दिवसांत त्याच्या सील केलेल्या कार्यालयाचा चार वेळा पंचनामा करून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. जादूटोणा, नरबळी आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली एसआयटी पुन्हा दोन दिवसांच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.

  • 29 Mar 2026 09:17 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये आता बांधकाम व्यावसायिक रडारवर, सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार कायदेशीर कारवाई

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ज्या बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांना ताबा देण्यापूर्वी पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारणारे लेखी हमीपत्र दिले आहे, त्यांना आता ती जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, जर गृहनिर्माण सोसायट्यांवर पाणीपुरवठ्याचा अन्यायकारक आर्थिक भार टाकला, तर संबंधित विकासकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

  • 29 Mar 2026 09:07 AM (IST)

    पुणेकरांनो पाण्याचे टँकर देणाऱ्यांना पैसे देऊ नका; महापालिकेचे स्पष्ट आवाहन

    पुणे शहरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून पाण्याची मागणीही वाढली आहे. ज्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे, तिथे पुणे महानगरपालिकेतर्फे मोफत टँकरची सुविधा दिली जात आहे. मात्र, काही टँकरचालक किंवा मालक नागरिकांकडून पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, पालिकेच्या टँकरसाठी नागरिकांनी कोणतेही पैसे देऊ नयेत आणि कोणी मागणी केल्यास त्याबाबत तक्रार करावी.

  • 29 Mar 2026 09:02 AM (IST)

    पुणे विमानतळ ठरले देशात अव्वल, प्रवाशांना उत्तम सेवा देण्यात पटकावला पहिला क्रमांक

    भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या ‘एसीआय-एसीक्यू सर्व्हे २०२५’ नुसार, पुणे विमानतळाने देशातील सर्व विमानतळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. दर्जेदार सुविधा, प्रवाशांचे समाधान आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर पुण्याने गोवा आणि इंदूरला मागे टाकत हे यश संपादन केले असून, यामुळे विद्येच्या माहेरघराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

Follow Us