महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, कुठे-कुठे कोसळणार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्रात पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. उंच लाटांचा इशारा देखील देण्यात आला आहे.

सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यासोबतच कोकण किनारपट्टी, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच आता हवामान विभागाने, राज्यात पुढील २४ तासांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासाठी पुढील २४ तासात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे उन्हाने दडी मारली असून सध्या आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टी परिसरात ऑरेंड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा, कोल्हापूरसह घाटमाथा परिसरासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर परिसरात आज सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते उद्या (२४ जुलै) रात्री ८.३० वाजेपर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. तसेच पालघर आणि रायगड या जिल्ह्यात उद्या २४ जुलैपर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटा उसळतील, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे लहान बोटी आणि होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन
पुढील तीन तासांत रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जालनाच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्रीसह आसपासच्या परिसरात मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. २० दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील कपाशी, मका, सोयाबीन यासह इतर पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. शेतात पाणी साचल्याने काही काळ तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची मागणी होत आहे. तसेच जालन्याच्या मंठा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. काही ठिकाणी हा पाऊस दिलासादायक ठरला असला तरी, टाकळखोपा, शिरपूर यासह आसपासच्या परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे गावाजवळील लघु बंधारा पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्याने ओसंडून वाहत आहे.
