क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 7 आमदारांवर कारवाईचा बडगा
विधानपरिषदेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांच्या विरोधात पक्षाकडून कारवाईची शक्यता आहे. काँग्रेसच्या ७ आमदारांवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांनी यासाठी दिल्लीत हायकमांडसोबत चर्चा देखील केलीये. या सर्व प्रकरणावर १९ तारखेच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

विधानपरिषदेत क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या ७ आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी दिल्लीत हायकमांडसोबत चर्चा देखील केली. दरम्यान या सर्व प्रकरणावर १९ तारखेच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सतेज पाटलांनी म्हटलं आहे.
विधानपरिषदेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात काँग्रेस अॅक्शन मोडवर आली आहे. आमदारांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी यासाठी पटोलेंनी दिल्लीत हायकमांडसोबत चर्चा केलीये. दरम्यान बेईमानी करणाऱ्या आमदारांची नावं जनतेसमोर आणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अभिजीत वंजारींनी केली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक प्रतिनिधी म्हणून अभिजीत वंजारींची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान काँग्रेसचे 7 आमदार कसे फुटले यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयाचा कोटा 23 मतांचा होता. काँग्रेसकडे एकूण मतं 37 होती. प्रज्ञा सातव यांच्यासाठी काँग्रेसकडून 30 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. मात्र प्रज्ञा सातवांना 25 मतं पडली. म्हणजेच काँग्रेसची इथे 5 मतं फुटली. तर काँग्रेसची 37 पैकी उर्वरित 7 मतं मिलिंद नार्वेकरांना देण्याचं ठरवलं होतं. मात्र, नार्वेकरांना ठाकरे गट, माकप आणि एक अपक्ष मिळून 17 आणि काँग्रेसची 5 मतं मिळून एकूण 22 मतं पडली. म्हणजेत काँग्रेसच्या 7 मतांपैकी नार्वेकरांना केवळ 5 मतं पडली आणि 2 मतं फुटली.
ज्यांनी गद्दारी केली त्यांना सोडलं जाणार नसल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसमध्येच सर्वच क्रॉस व्होटिंग करणाऱे आहेत त्यामुळे कोणाकोणावर कारवाई करणार? असं म्हणत संजय निरुपम यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
क्रॉस व्होटिंगवरुन माझी बदनामी सुरु असल्याचं आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान सुरु असलेली बदनामी थांबवावी अशी मागणी खोसकर यांच्याकडून करण्यात आली आहे.
19 तारखेला महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत बैठक होणार आहे. दरम्यान या बैठकीत फुटलेल्या 7 आमदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीत कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
