पेरणी कधी करावी? कोणत्या तारखेला कुठे पाऊस? डॉ. पंजाबराव डख यांनी दिली A टू Z माहिती
मे महिन्याच्या पावसामुळे महाराष्ट्रात चांगला ओलावा आहे. हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना चांगल्या बियाण्यांचा आणि खतांचा वापर करून शेतीची मशागत करण्याचा सल्ला दिला आहे. जून महिन्यात वेळेवर पेरणी करणे फायदेशीर ठरेल असे त्यांनी सांगितले आहे.

मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला ओलावा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना चांगले बियाणे आणि खत वापरून शेतीची मशागत करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पेरणी कधी करावी, आगामी पाऊस कधी होईल याबद्दलचेही अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवले आहेत.
शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस
राज्याच्या हवामान खात्याने १० जूनपर्यंत पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला दिला आहे. मात्र, पंजाबराव डख यांच्या मते, एक इंच ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक असते. यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार आहेत. यंदाचा हंगाम पेरणीसाठी अतिशय चांगला असून, जून महिन्यात वेळेवर पेरण्या करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. विशेष म्हणजे, १ जून रोजी महाराष्ट्रात सहसा पाऊस नसतो, पण यंदा त्यापूर्वीच झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. ज्या वर्षी जून महिन्यात पेरणी होते, त्या वर्षी पिकांना चांगला उतारा येतो, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.
“यंदा कधी नव्हे ते शेतकऱ्यांना जून महिन्यात वेळेवर पेरणी करता येईल, ज्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती पाहून स्वतः पेरणीचा निर्णय घ्यावा. राज्यात सध्या काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. २-३ जून रोजी नाशिक आणि सोलापूरमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. १ ते ६ जून या काळात सूर्यदर्शन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वेळेचा उपयोग करून शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत”, असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.
पेरणीयोग्य स्थिती होताच पेरणी करून घ्या
यानंतर, ७ ते ८ जून दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता असून, त्यानंतर चार दिवस पाऊस विश्रांती घेईल. शेतकऱ्यांनी जमिनीत झालेला भरपूर ओलावा पाहून पेरणीची तयारी करावी. पेरणीयोग्य स्थिती होताच पेरणी करून घ्यावी, असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.
“पुढील दोन दिवसांत मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. तसेच १ ते ६ जून या काळात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणपट्ट्यात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ७ ते १० जून या काळात राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. तर १३ ते १७ जून या कालावधीत राज्यात परत एकदा जोरदार पाऊस होईल. ज्यामुळे ओढे-नाले वाहतील आणि धरणांमध्ये पाणीसाठा वाढेल, जे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल”, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
जूनमध्ये अनेक बंधारे भरतील
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “यंदा मान्सून पूर्वेकडून येणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे. जेव्हा मान्सून मुंबईतून येतो, तेव्हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असते. मात्र, यंदाच्या पूर्वेकडील मान्सूनमुळे दुष्काळी पट्ट्यातील जिल्ह्यांसाठी आनंदाची बातमी असून, जूनमध्ये अनेक बंधारे भरतील”, असा विश्वास डख यांनी व्यक्त केला आहे.
