
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने अपघातांची मालिका घडत आहे. त्यातच आता वर्ध्यात एक भीषण अपघात झाला आहे. वर्ध्यात रस्त्यावर रानडुक्कर आडवे आल्याने कारचा अपघात झाला आहे. वर्ध्यातील तरोडा परिसरात कार आणि टँकरची धडक झाली. यात धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघात एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी असे चौघेजण ठार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य आपल्या कुटुंबासोबत कारने वर्ध्याकडे येत होते. मध्यरात्री वर्धा-समुद्रपूर मार्गावरील तरोडा शिवारात कारने प्रवास अचानक रस्त्यावर रानडुक्कर आडवे आले. त्यामुळे प्रशांत वैद्य यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि त्यांची कार समोरून येणाऱ्या टँकरला धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.
या अपघातात प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत वैद्य आणि त्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु आहे.
तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील वडूज-दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराजवळ झालेल्या तिहेरी अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारने प्रथम ओमिनी कारला धडक दिली. त्यानंतर वडूजच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपला धडक दिली. या अपघातात औंध येथील शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार या दोन युवकांचा मृत्यू झाला. तर इतर जखमींना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून वडूज पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.